'जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा,' जिल्हाधिकारी कार्यालयात टाकली सोयाबीनची करपलेली झाडे
By ज्ञानेश्वर भाले | Published: September 4, 2022 07:57 PM2022-09-04T19:57:40+5:302022-09-04T19:58:36+5:30
जिल्ह्यात सलग बावीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.
परभणी : जिल्ह्यात सलग बावीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तत्काळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीनची करपलेली झाडे टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
परभणी जिल्ह्यात जवळपास पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची पेरणी केली. ही पिके बहरात असताना ऑगस्ट महिन्यापासून सलग बावीस दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या शेंगा भरत असतानाच ही उघडीप शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली. पावसाने उघडीप दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करणे गरजेचे होते. मात्र, जिल्हा प्रशासनाला याबाबत कोणतेच देणे- घेणे नसल्याचे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीनची करपलेली झाडे टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
त्यानंतर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. यावेळी शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, माधवी घोडके, रामेश्वर जाधव, सय्यद मुस्तफा, ज्ञानेश्वर पंढरकर, नकुल होगे, उद्धव गरुड, माऊली गरुड, सचिन शेरे आदींची उपस्थिती होती.