४० फूट पुलाखाली आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; दैठणा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 02:18 PM2023-09-17T14:18:49+5:302023-09-17T14:19:38+5:30
तपास सुरु.
लक्ष्मण कच्छवे, दैठणा (जि.परभणी) : परभणी तालुक्यातील दैठणा जवळील गंगाखेड-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या ४० फूट खोल पुलाखाली शनिवारी सायंकाळी ६ च्या सूमारास कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याचे समजले. क्रेनच्या सहाय्याने हा मृतदेह बाहेर रविवारी दुपारी १२ च्या सुमारास काढण्यात आला. पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे समोर आले. मात्र, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
याबाबत माहिती अशी, सदरील पुलाखाली हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे काही नागरिकांना हे लक्षात आल्यावर त्यांनी गावच्या पोलीस पाटील राजश्री चव्हाण यांना कळविले. त्यांनी दैठणा पोलीसांना माहिती दिली. यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.आर.बंदखडके, सपोनी.संजय वळसे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. इंद्रायणी नदीच्या पुलाची उंची ४० फूट असल्यामुळे व नदीत पाणी, काटे कुपाटे असल्याने मृतदेह काढण्यास अडचण येत होती. त्यातच सायंकाळ झाल्यामुळे अंधारात काढण्यासाठी अडचणी आल्यामुळे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी मृतदेह क्रेनच्या सहायाने बाहेर काढण्यात आला.
या मृतदेहाच्या उजव्या हातावर मुंजा एकनाथ कटारे असे गोंदलेले नाव आहे तर बाजूला एक ओम गोंदलेला आहे. हा मृतदेह दोन-चार दिवसापासून पाण्यामध्ये असल्यामुळे एकदम सडलेल्या अवस्थेत असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. हे ठिकाण दैठणा गावापासून एक किमी अंतर असून रात्रीच्या वेळी सुनसान इलाका आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी रविवारी दूपारी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र शिरतोडे, सपोनि बी.आर.बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे उपस्थित होते. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. घटनेची नोंद दैठणा ठाण्यात करण्याचे काम सुरु होते. या ठिकाणी श्वान पथकाला सुध्दा पाचारण करण्यात आले होते.