परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील भूजल पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 08:43 PM2018-11-30T20:43:39+5:302018-11-30T20:44:04+5:30
आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
परभणी: भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये आठ तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झाले असून या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
यावर्षी जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती नोव्हेंबरमध्येच दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाळा होतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थीर राहते; परंतु, यावर्षी परतीचा पाऊस झाला नाही. पावसाळ्यातील संपूर्ण दोन महिने कोरडे गेले. परिणामी आॅक्टोबर महिन्यात भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात आठ तालुक्यांमधील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
भूजल सर्व्हेक्षण विभागाने निश्चित केलेल्या निरिक्षण विहिरींमधील आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विहिरींच्या पाणी पातळींची नोंद घेतली. त्यात आठ तालुक्यात पाणीपातळीत घट झाली आहे. मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीची आणि यावर्षीच्या पाणीपातळीची तुलना केली असता परभणी तालुक्यात आॅक्टोबर महिन्यामध्ये सरासरी ७.७५ मीटरपर्यंत पाणीपातळी स्थीर राहते. यावर्षी ती ८.४८ मीटरवर गेली आहे. त्यामुळे ०.७३ मीटरची घट नोंद करण्यात आली. पाथरी तालुक्यात ७.४२ मीटरवरील पाणीपातळी ८.२० मीटरवर पोहचली आहे. या तालुक्यातही ०.७८ मीटर पाणीपातळीत घट झाली आहे.
सोनपेठ तालुक्यामध्ये पाणीपातळीत तब्बल ३.५४ मीटरने घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये पाणीपातळी सरासरी ७.३२ मीटर असते. ती यावर्षी १०.८६ मीटरवर गेली आहे. मानवत तालुक्यामध्ये २.१५ मीटरची घट आहे. तालुक्यात ४.४३ मीटरवर असलेली पाणीपातळी ६.५८ मीटर खोल गेली आहे. सेलू तालुक्यामध्ये ६.७१ मीटर असलेली पाणीपातळी ९.१२ मीटरपर्यंत खोल गेली असून २.४१ मीटरची घट झाली आहे. गंगाखेड तालुक्यामध्येही पाणीपातळीत मोठी घट आहे. या तालुक्यात ७.६२ मीटरवर असलेली पाणीपातळी ९.३३ मीटरवर पोहचली असून १.७१ मीटरची घट तालुक्यात झाली आहे.
पालम तालुक्यामध्ये ५.०९ मीटरवरुन ५.०७ मीटरवर पाणीपातळी पोहचली असून ०.०२ मीटरची घट नोंद झाली आहे. तर जिंतूर तालुक्यात ५.४१ मीटरवरील पाणीपातळी ५.८७ मीटरवर गेली असून ०.४६ मीटरची घट झाली आहे. सहाही तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अनेक पाणीपुरवठा योजनांसाठी घेतलेल्या उद्भव विहिरींची पाणीपातळी घटल्याने योजना ठप्प पडू शकतात. परिणामी टंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.
८६ विहिरींचे केले निरीक्षण
भूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील भूजलपातळीची नोंद घेण्यासाठी एकूण ८६ विहिरींचे निरीक्षण केले. त्यात परभणी तालुक्यातील १४, पूर्णा ७, पाथरी ८, सेलू १२, मानवत ४, गंगाखेड ९, पालम ७, सोनपेठ ५ आणि जिंतूर तालुक्यातील २० विहिरींचे निरिक्षण घेऊन भूजल पातळीची नोंद घेण्यात आली आहे.
पूर्णा तालुक्यातच वाढली पातळी
इतर तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाली असली तरी पूर्णा तालुक्यात मात्र ही पातळी वाढली आहे. सर्वसाधारणपणे आॅक्टोबर महिन्यात या तालुक्यामध्ये ४.९० मीटरपर्यंत पाणीपातळी असते. मात्र ती यावर्षी २.६६ वर आली आहे. याचाच अर्थ २.२४ मीटरने पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्णा तालुक्यामध्ये यावर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. इतर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी पूर्णा तालुक्यात मात्र सरासरी एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात भूजल पातळीत वाढ नोंदवली आहे.
मागील वर्षी एकाच तालुक्यात घट
मागील वर्षीच्या भूजल पातळीची तुलना करता आॅक्टोबर महिन्यामध्ये केवळ पूर्णा तालुक्यात भूजलपातळीत घट झाली होती. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र भूजल पातळीत वाढ झाली. यावर्षी नेमकी उलट परिस्थिती झाली आहे. पूर्णा तालुका वगळता सर्व तालुक्यात भूजल पातळी घटली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात परभणी तालुक्यात १.५३ मीटरने भूजल पातळी वाढली होती. पाथरी तालुक्यात २.३८, सेलू १.२८, मानवत २.४१, गंगाखेड ०.०९, पालम ०.४४, सोनपेठ ०.५२ आणि जिंतूर तालुक्यात २.२५ मीटरने भूजलपातळीत वाढ झाली होती; परंतु, पूर्णा तालुक्यात मात्र ०.१२ मीटरने भूजल पातळी खोल गेली होती. दरम्यान, यावर्षी आठ तालुक्यांमध्ये भूजल पातळीमध्ये घट झाली असल्याने या सर्व तालुक्यांमध्ये पाणी टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे.