जिवंत राहण्यासाठी हरणाने केला संघर्ष; वेळीच वनाधिकारी न आल्याने बुडून झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 02:07 PM2019-11-28T14:07:20+5:302019-11-28T14:10:26+5:30
जिवंत राहण्यासाठी हरणाने दिवसभर केला संघर्ष
पाथरी (जि. परभणी) : तालुक्यातील सारोळा खु. येथे विहिरीत पडलेल्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. गावातील विहिरीत हरी ण पडल्याची माहिती गावकऱ्यांनी बुधवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती; परंतु, हे अधिकारी गावात फिरकलेच नाहीत. अखेर सायंकाळी या हरणाचा मृत्यू झाला.
तालुक्यातील खेर्डा येथील सदाशीव मुरलीधर सीताफळे यांच्या सारोळा खु. येथील शेतातील विहिरीत हरीण पडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. उपसरपंच विष्णू सीताफळे व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी परभणी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थ हरणाचे प्राण वाचविण्यासाठी घटनास्थळी धाऊन गेले. दिवसभरात अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला; परंतु, वन अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेकडे दुर्लक्ष केले. तुम्हीच हरिण काढून घ्या, असा सल्लाही ग्रामस्थांना दिला.
दिवसभर पाण्यात राहिल्याने सायंकाळच्या सुमारास या हरणाचा मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे हरणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप खेर्डा येथील उपसरपंच विष्णू सीताफळे यांनी केला आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही देण्यात आली आहे.