कोरोना संसर्ग काळात ७० पॉझिटिव्ह मातांची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:22 AM2021-02-17T04:22:59+5:302021-02-17T04:22:59+5:30
परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात अनेक जण घराबाहेर पडण्यासही धजावत नव्हते. अशा काळात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह ...
परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात अनेक जण घराबाहेर पडण्यासही धजावत नव्हते. अशा काळात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ७० मातांची यशस्वी प्रसूती येथील स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
मागील वर्षातील एप्रिल ते ऑगस्टपर्यंतचा काळ सर्वांसाठी भीतीच्या सावटाखाली गेला. कोरोनाचा रुग्ण म्हटल्यास त्या भागापासूनही चार हात दूर राहण्याची मानसिकता भीतीपोटी निर्माण झाली होती. हा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन पुकारल्याने अनेकांना तीन ते चार महिने घराबाहेर पडता आले नाही. अशा परिस्थितीत येथील स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आणि विशेष म्हणजे कोरोनाबाधित असलेल्या महिलांची प्रसूती करण्याचे काम स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. कोरोना संसर्गाचा काळ आठवला तरी हे काम किती जिकरीचे होते, हे लक्षात येऊन जाते. माता कोरोनाबाधित असताना पीपीई कीटचा वापर करून या महिलांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. एप्रिल ते डिसेंबर या दहा महिन्यांतील ही आकडेवारी आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रसूती यशस्वी झाल्या असून, माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे. कोरोना काळात स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी या मातांसाठी धावून आल्यानेच या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकल्या.
४० प्रसूती नॉर्मल
कोरोनाबाधित असलेल्या ७० पैकी ४० मातांची प्रसूती नॉर्मल करण्यात आली आहे, तर २६ मातांची प्रसूती सिझेरियनच्या साह्याने झाली. चार मातांचा गर्भपात करावा लागला. स्त्री रुग्णालयात नॉर्मल प्रसूती करण्यावरच भर दिला जातो. त्यातून दाखल झालेल्या ७० पैकी ४० मातांची नॉर्मल प्रसूती करण्यात आली.
१ हजार मुलांमागे ९२२ मुली
येथील स्त्री रुग्णालयात डिसेंबर महिन्यापर्यंत ८ हजार ४८० महिलांची प्रसूती झाली आहे. यामध्ये स्त्री-पुरुष प्रमाण १ हजार मुलांमागे ९२२ मुली असे राहिले आहे. ९२१ नवजात बालकांचा वजन कमी असल्याने मृत्यू झाला.
अतिदक्षता विभागातील ५८ बालकांचा मृत्यू
येथील स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात या दहा महिन्यांच्या काळात १ हजार २७५ बालकांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ९९४ बालकांची सुटी झाली असून, ५८ बालकांचा मृत्यू झाला आहे, तर ५९ बालकांना इतर रुग्णालयांत संदर्भित सेवा दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.