स्मशानभूमीत सुविधा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:10+5:302021-01-25T04:18:10+5:30
परभणी : येथील खंडोबा बाजार भागातील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र कुंभार समाज ...
परभणी : येथील खंडोबा बाजार भागातील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने आयुक्तांकडे केली आहे.
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने स्मशानभूमीतील सुविधांसंदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे. स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीला तडे जाऊन भिंतीची पडझड झाली आहे. तेव्हा पक्के बांधकाम करून भिंतीची उंची वाढवावी, परिसरातील अनावश्यक झुडपे, गवत काढून परिसर स्वच्छ करावा, स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला कमान तयार करून लोखंडी गेट बसवावे, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून ते स्मशानभूमीपर्यंत तसेच स्मशानभूमीच्या आतील बाजूस सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करावेत, या परिसरात हायमास्ट दिवे बसवावेत, स्मशानभूमीत थांबण्यासाठी निवारा शेडची उभारणी करावी, या स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीने काही समाधी आहेत, त्यांची दुरवस्था झाली आहे. परिसरातील काहीजण या ठिकाणी हुज्जत घालतात. या प्रकारास पायबंद घालावा, स्मशानभूमीत कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन उंडाळकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले आहे.