निजामकालीन इमारत पाडण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:08+5:302020-12-07T04:12:08+5:30
पिंगळी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा असून, या शाळेतच ज्ञानदान केले जाते. शाळेच्या इमारतीचे बांधकाम निजामकाळात ...
पिंगळी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा असून, या शाळेतच ज्ञानदान केले जाते. शाळेच्या इमारतीचे बांधकाम निजामकाळात झाले आहे. सध्या या शाळेची इमारत धोकादायक बनली असून, दरवाजे, खिडक्या खिळखिळ्या झाले आहेत. याशिवाय पावसाळ्यात शाळेचे छत ठिकठिकाणी गळत असल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना शिकविणे जिकिरीचे झाले आहे. शाळेच्या इमारतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून, नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी जुनी इमारत जमीनदोस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून शाळेची इमारत पाडण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून, साधारणत: एक महिन्यात ही इमारत पाडण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच नवीन इमारतीचे बांधकामही सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागत आहे.