डेंग्यू , घोड्या गोवर अन् चिकुन गुनियाचा ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:22 AM2021-09-17T04:22:59+5:302021-09-17T04:22:59+5:30
दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव वाढतो. यावर्षी देखील ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून ...
दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव वाढतो. यावर्षी देखील ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून जिल्हावासीय संसर्गजन्य तापीने त्रस्त आहेत. सुरुवातीला बालकांमध्ये या साथीचा फैलाव वाढला होता. आता मात्र मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांनाही साथीची लागण होत आहे. डेंग्यू, घोड्या गोवर आणि चिकुन गुनिया या तीनही साथीचे रुग्ण दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालय फुल्ल भरलेली आहेत. नागरिकांनी परिसराची स्वच्छता ठेवावी, उघड्यावरील अन्न खाण्याचे टाळावे. तसेच सकस आहार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.
काय आहेत लक्षणे
जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यू सदृश तापीचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. डेंग्यू तापीच्या रुग्णांमध्ये ताप मोठ्या प्रमाणात असतो. अंग दुखी ही होते. तसेच अंगावर बारीक पुरळ ही येते.
घोड्या गोवर साथीमध्ये ताप जास्त प्रमाणात असतो. डोके दुखते तसेच सांधेही दुखतात. अंगावर मोठ्या आकाराची पुरळ येतात.
चिकुन गुनिया आजारात ही रुग्णाला ताप येते. सर्व सांधे दुखतात. त्यामुळे या तापेला बोन ब्रेकिंग फिव्हर असेही म्हणतात.
दररोज ३० ते ३५ रुग्ण
शहरातील काही दवाखान्यांमध्ये संसर्गजन्य तापीचे दररोज ३० ते ३५ रुग्ण दाखल होतात. शहरी भागासह ग्रामीण भागातही ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण साथीच्या आजारावर उपचार करण्यासाठी येतात.
येथील जिल्हा रुग्णालयातही सध्या साधारणतः अडीचशे रुग्ण साथीच्या आजारावर उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयातील सर्वच वार्ड या रुग्णांनी भरले आहेत. विशेष म्हणजे बालकांचे प्रमाणही अधिक असल्याची माहिती सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात संसर्गजन्य तापीचा फैलाव सध्या दिसून येत आहे. पावसाळ्यात ही साथ पसरते. नागरिकांनी स्वत:च्या निवासस्थान जवळील परिसर स्वच्छ ठेवावा. छतावर साचलेले पाणी मोकळे करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डास निर्मूलनाचे उपाय करावेत. तसेच घराच्या परिसरातील नाल्या वाहत्या करुन त्यात गप्पी मासे सोडावेत.
-डॉ. किशोर सुरवसे,आरएमओ