दोघांवर परभणी जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
By राजन मगरुळकर | Updated: April 5, 2024 16:03 IST2024-04-05T16:03:31+5:302024-04-05T16:03:57+5:30
नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांवर विविध प्रकारच्या गुन्ह्यातील समावेशामुळे हद्दपारीची कारवाई

दोघांवर परभणी जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने जिल्ह्यातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जात आहेत. यामध्ये शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन इसमांवर विविध प्रकारच्या गुन्ह्यातील समावेशामुळे हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी नुकतेच जारी केले आहेत.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जात आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील काही आरोपींकडून बंधपत्र भरून घेणे सोबतच अन्य कारवाई करण्यात आल्या. नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्याकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केले होते.
त्यानुसार या दोन जणांवर पुढील एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यात मिर्झा इकबाल बेग मिर्झा इब्राहिम बेग (रा.आयशा नगर) आणि युसुफ खान माजिद खान (रा.महात्मा गांधी नगर, धार रोड) या दोघांचा समावेश असल्याची माहिती नानलपेठचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी दिली.