परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे शस्त्रे पोलिसांकडे जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:11 AM2019-03-28T00:11:10+5:302019-03-28T00:11:48+5:30
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५५० शस्त्र परवानाधारकांकडून जमा करून घेतले आहेत़ उर्वरित परवानाधारकांकडे शस्त्र जमा करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागातून देण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५५० शस्त्र परवानाधारकांकडून जमा करून घेतले आहेत़ उर्वरित परवानाधारकांकडे शस्त्र जमा करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागातून देण्यात आली़
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्र जमा करून घेतले जातात़ या अनुषंगाने १६ मार्च रोजी छाननी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली़ या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव, गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिरे, पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे उपनिरीक्षक सी़ए़ साखरे यांची बैठकीस उपस्थिती होती़ निवडणूक कालावधीमध्ये परवानाधारकांकडून शस्त्र जमा करून घेणे आवश्यक आहे़ पोलीस विभागाने हे शस्त्र जमा करून घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी बैठकीत दिल्या होत्या़ तसेच एखाद्या परवानाधारकाने विहित मुदतीत शस्त्र जमा न केल्यास त्याच्यावर खटला दाखल करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले़ जिल्ह्यात ८५१ नागरिकांना शस्त्र परवाना दिला आहे़ त्यांच्याकडून शस्त्र जमा करून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे़ आतापर्यंत ५५० शस्त्र जमा झाले आहेत़ संबंधित परवानाधारकाच्या पोलीस ठाण्यात हे शस्त्र जमा करून घेतले जाते़ निवडणुकीनंतर आठ दिवसांमध्ये परवाना धारकास शस्त्र परत केले जाते़
चौघांचे अर्ज फेटाळले
निवडणुकीच्या काळात शस्त्र परवानाधारकाकडील शस्त्र जमा करून घेतले जात असले तरी एखाद्या परवानाधारकास शस्त्राची नितांत आवश्यकता असल्यास परवानाधारक या संदर्भात अर्ज करून शस्त्र जमा करण्याच्या प्रक्रियेतून सूट मागू शकतो़ या पार्श्वभूमीवर ४ परवानाधारकांनी अर्ज केले होते़ या अर्जावर छाननी समितीच्या बैठकीत चर्चा झाली़ अर्जात नमूद केलेली कारणे संयुक्तीक नसल्याचे सांगत समितीने चौघांचेही अर्ज फेटाळून लावले असून, त्यांचे शस्त्र जमा करून घेण्याचे आदेश दिले आहेत़