कृषी उपसंचालकांनी घेतला फळबाग लागवडीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:17 AM2021-01-23T04:17:38+5:302021-01-23T04:17:38+5:30
परभणी: पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातील कृषी उपसंचालक दयानंद जाधव यांनी २२ जानेवारी रोजी तालुक्यातील विविध भागांसह पोखर्णी नृसिंह ...
परभणी: पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातील कृषी उपसंचालक दयानंद जाधव यांनी २२ जानेवारी रोजी तालुक्यातील विविध भागांसह पोखर्णी नृसिंह येथील महिला शेतकऱ्यांच्या फळबाग योेजनेला भेट देऊन आढावा घेतला.
परभणी येथील तालुका कृषी कार्यालयांतर्गत गटशेती सबलीकरण, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, मनरेगाअंतर्गत फळबाग लागवड योजना, प्रकल्प ग्रामबीजोत्पादन, उन्हाळी ग्रामबीजोत्पादन, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान, पोकराअंतर्गत विविध कार्यक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातील दयानंद जाधव यांनी २२ जानेवारी रोजी परभणी तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. यामध्ये तालुक्यातील सिंगणापूर येथील गटशेती सबलीकरणांतर्गत स्थापन झालेल्या प्रभावती फ्रेश फ्रुट ॲन्ट व्हिजीटेबल प्रोड्युसर कंपनीला भेट देत तपासणी केली. त्यानंतर ताडपांगरी येथील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत हरभरा पिकाची तपासणी करून लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पोखर्णी येथील महिला शेतकरी वर्षा सुरेशराव मोते यांच्या शेतात मनरेगा योजनेंतर्गत लागवड केलेल्या लिंबू क्षेत्राची तपासणी केली. त्यानंतर या योजनेबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, दैठणा येथील मंडळ कृषी अधिकारी बी. एम. कच्छवे, एस. ए.धर्माधिकारी, पी. आर. गोरे, व्ही. के. जोशी, व्ही. पी. हातोले, सी. के. भोकरे, एस. बी. पाटील, एस. पी. खापरे आदींची उपस्थिती होती.
कैलासवाडी, भारस्वाडा येथेही दिली भेट
परभणी तालुक्यातील भारस्वाडा येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरणाची तपासणी केली. तसेच वंदना विजय चौधरी यांच्या शेतात असलेल्या बीबीएफ यंत्राची तपासणी केली. त्यानंतर कैलासवाडी येथे उन्हाळी ग्रामबीजोत्पादनांतर्गत चंदन तातेराव पवार यांच्या शेतात लागवड केलेल्या सोयाबीन पिकास भेट दिली. त्यानंतर कृषी उपसंचालक दयानंद जाधव यांनी उन्हाळी सोयाबीन घेण्याचे आवाहनही केले.