परभणी जिल्ह्यात प्रवेश मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनाची बतावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:31 PM2020-04-13T23:31:07+5:302020-04-13T23:31:26+5:30

जिल्ह्यात प्रवेश मिळावा, यासाठी चक्क वडिलांच्या निधनाची बतावणी केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत उघड झाला असून, पुण्याहून आलेल्या तिघांविरुद्ध राष्टÑीय आपत्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Describes father's demise to gain access to Parbhani district | परभणी जिल्ह्यात प्रवेश मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनाची बतावणी

परभणी जिल्ह्यात प्रवेश मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनाची बतावणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): जिल्ह्यात प्रवेश मिळावा, यासाठी चक्क वडिलांच्या निधनाची बतावणी केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत उघड झाला असून, पुण्याहून आलेल्या तिघांविरुद्ध राष्टÑीय आपत्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिर्शी येथील मूळचे रहिवासी असलेले आकाश वैजनाथ रणदिवे, वैजनाथ इंद्रूबा रणदिवे आणि रेखा वैजनाथ रणदिवे हे पुणे जिल्ह्यातील चाकण येथे वास्तव्याला होते. संचारबंदीमुळे तिघेही चाकण येथेच अडकले. गावाकडे परतण्यासाठी हे तिघेही पुणे येथून एमएच-१२ एनएक्स- २९३१ या कारने सोनपेठ तालुक्याकडे निघाले. १३ एप्रिल रोजी तालुक्यातील डिघोळ येथील चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांची गाडी अडविली. त्यांच्याकडे चौकशी केली असता वडिलांचे निधन झाल्याने गावाकडे जात असल्याचे वैजनाथ यांनी पोलिसांना सांगितले.
या माहितीवरुन पोलिसांनी शिर्शी येथे फोन करुन खातरजमा केली असता त्यांच्या वडिलांचे निधन तीस वर्षापूर्वीच झाले असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांना खोटी माहिती देवून जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला आहे. विशेष म्हणजे या तिघांनी तोंडाला रुमाल अथवा मास्कही लावला नव्हता. या सर्व प्रकारानंतर पोलीस नाईक मनिष कौठाळे यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तिघांचीही ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात सीमाबंदी असल्याने वेगवेगळी कारणे सांगून जिल्ह्यात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वी रुग्णवाहिकेतून परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश केला जात असल्याचा प्रकारही पोलिसांनी उघडकीस आणला होता.

Web Title: Describes father's demise to gain access to Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.