धक्कादायक ! चारठाण्यात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 06:33 PM2020-08-18T18:33:22+5:302020-08-18T18:36:58+5:30
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही.
चारठाणा: जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नदीकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार उरकले जात आहेत. १६ ऑगस्ट रोजी एका इसमाचे निधन झाले. मात्र या इसमावर अंत्यसंस्कार करताना बंजारा समाजबांधवांना मोठ्या हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्याचा प्रकार समोर आला.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १६ ऑगस्ट रोजी रेखा रुपचंद राठोड या साठ वर्षीय इसमाचे निधन झाले. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. अग्नी देताना पावसाची रिपरिप सुरु झाली. पावसाचे पाणी अग्निवर पडत असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत अग्नि देवूनही हा मृतदेह व्यवस्थित जळाला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑगस्ट रोजी घटनास्थळी जावून कुटुंबियांनी पाहणी केली. तेव्हा हा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचे आढळून आले.
दरम्यान, या मृतदेहाला पुन्हा अग्नि देण्यात आला. विशेष म्हणजे ही अग्नी देताना २५ लिटर डिझेल, ५ लिटर पेट्रोल, चारचाकी गाडीचे दहा टायर टाकल्यानंतर हा मृतदेह पूर्णत: जळाला. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नदीकाठी उघड्यावर मृतदेह जाळावा लागत आहे. पावसाळ्यात एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास हलअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे शासनाने गंभीरतेने पाहत स्मशानभूमीला जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी समाजबांधवांकडून होत आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीनता
जिंतूर तालुक्यातील चारठाणा सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, राजकारणासाठी हे गाव तालुक्याचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सहाजिकच या गावामध्ये लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आहेत. या गावातील लोकप्रतिनिधींनी अनेक पदेही भूषवून जिल्ह्यात राजकारणात सक्रिय सहभाग नोंदविला. मात्र स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही चारठाणा येथील बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी या लोकप्रतिनिधींना अजूनही वेळ भेटलेला नाही. तसेच या समाजाच्या स्मशानभूमीचा मार्ग निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधीकडून शासन, प्रशासन दरबारी पाठपुरावाही करण्यात आला नाही. त्यामुळे बंजारा समाज बांधवांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी समाजबांधवातून होत आहे.