निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:19 AM2021-09-18T04:19:37+5:302021-09-18T04:19:37+5:30

शहरात सध्या शाळा, महाविद्यालय बंद असली तरी युवती, मुली व महिलावर्ग सणासुदीच्या काळात बाजारपेठेत ये-जा करतात. तसेच अनेक ठिकाणी ...

The deserted place became a den of criminals | निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे

निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे

Next

शहरात सध्या शाळा, महाविद्यालय बंद असली तरी युवती, मुली व महिलावर्ग सणासुदीच्या काळात बाजारपेठेत ये-जा करतात. तसेच अनेक ठिकाणी मोकळ्या रस्त्याने कामानिमित्त ये-जा करताना काही टारगट मुलांकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. तर मोकळ्या जागा अवैध व्यवसाय तसेच दारू पिण्यासाठी एकत्र जमण्याचे ठिकाण म्हणून वापरल्या जात आहेत. याकडे शहरातील पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे महिला वर्गाला बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.

येथे पोलिस चुकूनही दिसत नाहीत

संभाजीनगर, दादाराव प्लॉट, प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या वसाहती, विष्णू नगर परिसरातील मैदान, शिवाजीनगर येथील गणपती मंदिर, लोकमान्य नगर, उघडा महादेव ते एमआयडीसी परिसर, कृषी विद्यापीठातील मैदाने व स्टेडियम परिसर या ठिकाणी पोलीस चुकूनही गस्तीसाठी दिसत नाहीत.

ही ठिकाणे धोक्याचीच

संभाजीनगर

शहरातील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला जुन्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयाचे मोकळे मैदान तसेच दादाराव प्लॉट प्रशासकीय इमारतीची मागील बाजू या ठिकाणी दिवसा व रात्री काही टारगट मुले दारू पिणे, गोंधळ घालणे, छेड काढणे असे प्रकार करतात.

विष्णु नगर मैदान

विष्णुनगर येथील मैदानात दिवस-रात्र अनेक जण दारू पिऊन धिंगाणा करणे, गोंधळ घालणे, ये-जा करणाऱ्यांची छेड काढणे हे प्रकार करतात.

कृषी विद्यापीठ परिसर

कृषी विद्यापीठ परिसरातील काळी कमान ते प्रशासकीय इमारत या विस्तीर्ण परिसरात अनेक मोकळी मैदाने आहेत. येथे असे प्रकार अनेकदा घडतात. यामुळे फिरायला ये-जा करणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो.

पोलिसांकडे हवी ठिकाणांची यादी

शहरातील मोकळ्या जागा तसेच काही निर्जन स्थळ व रस्ते जेथे वाहतूक कमी आहे व मुलींचा वावर ज्या भागात अधिक प्रमाणात आहे अशा स्थळांची माहिती पोलिस प्रशासनाकडे असणे गरजेचे आहे. त्यानुसार तेथे पोलीस ठाण्याचे पथक, दामिनी पथक आणि छेडछाड विरोधी पथकाने गस्त घालून टारगट मुलांना आवरणे गरजेचे आहे.

महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या

शहरात मोकळ्या जागी तसेच बाजारपेठेतील रस्त्यांवर आणि काही भागांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत गुन्हे दाखल होतात. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांची गस्त वाढणे गरजेचे आहे.

Web Title: The deserted place became a den of criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.