परभणी जिल्हा कचेरीतील कालबाह्य संचिका करणार नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:27 AM2018-08-07T00:27:48+5:302018-08-07T00:29:53+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये जमा असलेल्या कालबाह्य संचिका नष्ट करण्याची प्रक्रिया २९ जुलैपासून सुरू झाली आहे़ या अंतर्गत सुमारे १ लाखाहून अधिक संचिका नष्ट होतील, अशी माहिती मिळाली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये जमा असलेल्या कालबाह्य संचिका नष्ट करण्याची प्रक्रिया २९ जुलैपासून सुरू झाली आहे़ या अंतर्गत सुमारे १ लाखाहून अधिक संचिका नष्ट होतील, अशी माहिती मिळाली़
जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या प्रत्येक कागदपत्रांचे त्या कागदपत्राच्या आवश्यकतेनुसार जतन केले जाते़ जिल्हाधिकारी कार्यालयातील सुमारे २० विभागातून येणारी ही कागदपत्रे रेकॉर्डमध्ये साठवून ठेवली जातात़ यातील काही कागदपत्रे एक ते दोन वर्षांसाठी, काही पाच वर्षांसाठी तर काही कागदपत्रे हे अमर्याद काळासाठी जतन करावयाची असतात़ प्रत्येक विभागाकडून येणाऱ्या या कागदपत्रांचे रेकॉर्ड तयार केले जाते़ सध्या जिल्हा प्रशासनातील रेकॉर्ड रुम अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे़ रेकॉर्ड रुममधील सर्व अभिलेख्यांचे स्कॅनिंग करून मॉर्डर्न रेकॉर्ड रुम तयार केली जाणार आहे़ या अंतर्गत सहा महिन्यांपासून कामकाज सुरू आहे़ हे काम करीत असताना अनेक कागदपत्रे ही नष्ट करणे आवश्यक असल्याची बाब समोर आली़ तसेच नवीन अभिलेखे, संचिका रेकॉर्ड रुममध्ये दाखल होत आहे़; परंतु, त्या साठविण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने जुन्या अनावश्यक संचिका नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले़ त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तहसीलदार विद्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी अभिलेखे बाहेर काढली जात आहेत़ ही अभिलेखे ज्या विभागातून देण्यात आली, त्या विभागात परत केली जात असून, विभागप्रमुखांनी त्या अभिलेख्यांचे महत्त्व लक्षात घेऊन ते नष्ट करावयाचे आहेत़ रेकॉर्ड किपर सुरेश पुंड यांच्यासह संजय शिंदे, हनुमान राऊत, हेमा गोंधळकर हे कर्मचारी सुसूत्रीकरणाची कामे करीत आहेत़
२० वर्षानंतर प्रथमच मोहीम
रेकॉर्ड रुममधील जुन्या संचिका यापूर्वी १९९८ मध्ये नष्ट करण्यात आल्या होत्या़ २० वर्षानंतर आता ही मोहीम हाती घेण्यात आली आहे़ विविध विभागातून येणाºया संचिकांची वर्गवारी केली जाते़ एक वर्षापर्यंत जतन करावयाच्या संचिकांना ड गटात टाकले जाते़ पाच वर्षापर्यंतच्या क गटात, १० वर्षापर्यंतच्या क-१ गटात, ३० वर्षापर्यंतच्या ब गटामध्ये आणि कायमस्वरुपी जतन करावयाच्या संचिका अ गटामध्ये टाकल्या जातात़ ड, क आणि क-१ या गटातील कालबाह्य संचिका नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ आतापर्यंत ड गटातील ३७४ गठ्ठे काढण्यात आले असून, त्यापैकी ३४७ गठ्ठ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे़ तर क-१ गटातील ३६४ गठ्ठ्यांमधील ३ हजार १०५ संचिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे़ सुमारे १ लाख संचिका या मोहिमेत नष्ट होण्याचा अंदाज आहे़