जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाहीचा निर्धार; सर्वच ३४ उमेदवारांनी घेतली माघार
By राजन मगरुळकर | Published: October 25, 2023 07:01 PM2023-10-25T19:01:08+5:302023-10-25T19:20:51+5:30
पूर्णा तालुक्यातील वझूर ग्रा.प.साठी ३४ जणांनी घेतले अर्ज माघारी, पूर्णा तालुक्यातील वझूर ग्रा.प.साठी ३४ जणांनी घेतले अर्ज माघारी
- गजानन नाईकवाडे
वझुर, ताडकळस (जि.परभणी) : मराठा आरक्षणासंदर्भात पूर्णा तालुक्यातील वझुरच्या ग्रामस्थांनी आक्रमक होत थेट होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यामध्ये ग्रा.प.च्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच्या सर्व ३४ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. सोबतच मराठा समाजाला आरक्षण नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निर्धार केला.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायत पाच जानेवारीपासून प्रशासक कार्यकाळ लागू करण्यात आला आहे. मागील आठ महिन्यापासून येथे प्रशासकीय कारभार सुरु होता. मागील काही दिवसापासून येथील निवडणूक प्रक्रिया चालू होती. त्यात २५ ऑक्टोबरला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ग्रामस्थांनी दोन पॅनलचे व अपक्ष अर्ज मिळून एकुण सदस्य पदासाठी ३१ अर्ज आले होते तर सरपंच पदासाठी तीन अर्ज आले होते. बुधवारी हे सर्व अर्ज माघार घेऊन ग्रामस्थांनी आरक्षण नाही तर निवडणूक नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. पूर्णा तालुक्यातील वझुर हे गोदावरी नदीकाठी वसलेले चार हजार मतदान असलेले गाव आहे. अकरा सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे.
सरपंचपद राखीव प्रवर्गासाठी तरीही माघार
वझुर येथे यावेळेसचे सरपंचपद हे राखीव प्रवर्गासाठी असले तरी आरक्षणाअभावी मराठा समाजावर अन्याय होत असल्यामुळे मराठा समाजासह इतर प्रवर्गातील उमेदवारांनी सोमवारी वझुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी मिळून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
पुढील निर्णय घेऊ
निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या ३४ जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने या निवडणुकीची पुढील प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. ही प्रक्रिया आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवत असून पुढील प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात येईल.
- वसंत विखे, वझूर ग्रा.पं.निर्वाचन अधिकारी.