रेशीम उद्योगातून विकासाचा ध्यास; कोल्हावाडीत ३२ महिलांच्या गटाने केली तुतीच्या नर्सरीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:07 PM2018-01-23T15:07:34+5:302018-01-23T15:10:25+5:30
मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील ३२ महिलांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादनासाठी गट तयार केला असून, तुतीची लागवड करुन कोष निर्मितीही केली जात आहे.
परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील ३२ महिलांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादनासाठी गट तयार केला असून, तुतीची लागवड करुन कोष निर्मितीही केली जात आहे.
मानवत तालुक्यात यावर्षी सोयाबीन, कापूस पिकांनी दगा दिला आहे. बोंडअळीमुळे कापसाचे सर्व क्षेत्र हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस पीक घ्यायचे की नाही, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. हजारो रुपये खर्च करुनही कापसापासून उत्पादन निघत नसल्याने तालुक्यातील कोल्हावाडी येथील महिला शेतकर्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. शेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न निघेल व आपला विकास होईल, अशी अपेक्षा बाळगून येथील ३२ महिला शेतकर्यांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील वातावरणही रेशीमसाठी अनुकूल असून राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षापासून मनरेगा योजने अंतर्गत रेशीम कोष उत्पादनासाठी तुती लागवड करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी कुशल ९० हजार, अकुशलसाठी २ लाख असे २ लाख ९० हजार रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील महिलांनी एकत्र येत ३२ महिलांचा गट तयार केला.
या गटामध्ये गावातील इतर बचतगटातील महिलांनीही सामावून घेतले. सध्या मनरेगा योजनेअंतर्गत तुतीची लागवड करण्यात आली आहे. तुतीची लागवड करुन नर्सरी सुरु केली असून रेशीम कोष, तुती लागवडीसाठी देवनांद्रा येथील माऊली टेकाळे यांच्या रेशीम कोष उद्योगाला या महिला गटांनी नुकतीच भेट देऊन रेशीम उद्योगाची पाहणी केली. या गटामध्ये माजी सरपंच वर्षा भिसे, शारदा भिसे, मीरा भिसे, उषा भिसे, उर्मिला भिसे, अनुराधा भिसे, वंदना भिसे, सरस्वती भिसे, मनकर्णा भिसे, कमल भिसे आदी महिलांचा समावेश आहे. सामूहिक शेती करुन रेशीम कोष उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिला शेतकरी येत असून रेशीम कोष उत्पादनाच्या माध्यमातून शेती करण्याचा मनोदयही केला जात आहे.
बाजारपेठेत मागणी
जागतिक बाजारपेठेमध्ये रेशीम कोषाला चांगली मागणी आहे. नगदी पीक असल्याने यातून आर्थिक विकास साधता येतो. तालुक्यातील वातावरणही पोषक असून या माध्यमातून शेती करता येते, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. थोडेसे नियोजन व मेहनत घेण्याची तयारी महिलांनी केली असून थोड्या शेतीमध्ये जास्त उत्पादन काढण्याची संधी निर्माण झाली आहे. महिलाही सकाळपासूनच तुतीचे रोपे जोपासण्यासाठी कामाला लागत आहेत.
महिलांचा सहभाग महत्त्वाचा
राज्य शासनाने तुती लागवडीचा मनरेगा योजनेत समावेश केला आहे. शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी या व्यवसायात महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरणारा आहे. कोल्हावाडी येथील महिला शेतकरी पुढे आल्या असून रेशीम कोष उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे.
- डी.ए. हाके, सहाय्यक संचालक