परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचे ढोल जागर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:21 PM2018-08-27T17:21:34+5:302018-08-27T17:25:27+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले.
परभणी- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजेपासून आंदोलनाला प्रारंभ झाला. तालुक्यातील ग्रामीण भागातील समाज बांधव परभणीत दाखल झाले होते. काठी, घोंगडी आणि डोक्यावर पिवळा पटका बांधून पारंपारिक वेषात काही ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सुरेश भूमरे, मारोतराव बनसोडे, टी.टी.सुभेदार, कठाळू शेळके आदींनी आपल्या भाषणांमधून समाजाला आरक्षणाची नितांत आवश्यकता असताना शासन वेळकाढू धोरण अवलंब असल्याचा आरोप करीत एस.टी. आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.