धनगर समाज आरक्षण: परभणी जिल्ह्यात सेलू, गंगाखेडमध्ये आज बंद, पाथरीत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:03 AM2018-08-13T01:03:14+5:302018-08-13T01:04:11+5:30
धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्ट रोजी गंगाखेड, सेलू येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. परभणी येथेही निवेदन दिले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्ट रोजी गंगाखेड, सेलू येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. परभणी येथेही निवेदन दिले जाणार आहे.
गंगाखेड येथे १३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास खंडोबा मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. धनगर समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. गंगाखेड तालुक्यात सोमवारी बंद पाळला जाणार आहे. व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जितेश गोरे, भाऊसाहेब कुकडे, नारायण घनवटे, जयदेव मिसे, भगवान बंडगर, रुखमाजी लवटे आदींनी केले आहे. तसेच सेलूत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्णा येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.
पाथरीत आज मोर्चा
पाथरी तालुक्यात मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. मोर्चाच्या आयोजनासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी राजे मल्हार मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव पितळे, उद्धवराव श्रावणे, माजी नगरसेवक नारायणराव पितळे, राधाकिशन डुकरे, अॅड.रोकडे आदींची उपस्थिती होती.
परभणीत देणार निवेदन
धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करावे, या मागणीसाठी परभणी येथे तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. यावेळी धनगर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.