पाॅझिटिव्ह रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्चदाब पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:02+5:302021-04-29T04:13:02+5:30
कोरोना झाल्याची भीती आणि त्यात मनावर आलेले दडपण यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे कोरोना शरीरात वाढण्यास मदत होते. ...
कोरोना झाल्याची भीती आणि त्यात मनावर आलेले दडपण यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे कोरोना शरीरात वाढण्यास मदत होते. यातच मधुमेह, उच्चदाब असलेला रुग्ण मनाने खचल्यास त्याला बरे होण्यास घरगुती उपायांपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरतो. यामुळे कोरोना झाल्याचे लक्षात येताच सर्वप्रथम उच्चदाब, मधुमेह याची तपासणी करावी. त्याचबरोबर ऑक्सिजनची पातळी किती आहे, हे दर दोन तासाला तपासून पहावे. याच्या नोंदी ठेवत डाॅक्टरांचे त्यावर लक्ष असू द्यावे. सध्या कोरोना बाधित होणारे ८० ते ८५ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात राहून बरे होऊ शकतात. यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घेऊन ताणतणाव न घेता स्वत:ला सावरणे गरजेचे आहे.
घाबरून न जाता उपचाराला प्रतिसाद द्यावा
पाॅझिटिव्ह निघालेले रुग्ण उपचारापूर्वी घाबरून जातात. यात जर एखाद्या रुग्णाला मधुमेह, उच्चदाब असेल तर त्याने आपली ऑक्सिजनची पातळी तपासावी. ती जर ९३ च्या खाली आली तर रुग्णालयात दाखल व्हावे. अन्यथा गृह विलगीकरणात राहून उपचार सुरू ठेवावेत. मधुमेह, उच्चदाबाचे प्रमाण जास्त झाले आणि त्यात पाॅझिटिव्ह असताना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास मग धोका वाढतो. यातून मृत्यू होण्याचा धोका संभवतो.
- डाॅ. रुपेश नगराळे, मधुमेह तज्ज्ञ.
या उपाययोजना कराव्यात
सहा मिनिटांची वाॅक टेस्ट करावी.
मधुमेहाची तपासणी करावी.
ऑक्सिजन लेव्हल दर दोन तासांनी तपासावी.
योग्य वेळी औषध, जेवणाचे सेवन करावे.
मानसिकदृष्ट्या खचू नये.
परभणी जिल्ह्यात मार्चमध्ये झालेले कोरोनाचे मृत्यू - ८६
इतर आजारांमुळे झालेले मृत्यू - ११
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे झालेले मृत्यू - ८३५