अपंग प्रमाणपत्र केंद्राला टाळे

By Admin | Published: March 4, 2015 03:38 PM2015-03-04T15:38:29+5:302015-03-04T15:38:29+5:30

तालुक्यातील /अस्थिव्यंग रूग्णांना अपंगाचे प्रमाणपत्र उपजिल्हा रूग्णालयात देण्यासाठी सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षाला मान्यता नसल्यामुळे टाळे लागले

Disability Certificate Center | अपंग प्रमाणपत्र केंद्राला टाळे

अपंग प्रमाणपत्र केंद्राला टाळे

googlenewsNext

मोहन बोराडे /सेलू
तालुक्यातील /अस्थिव्यंग रूग्णांना अपंगाचे प्रमाणपत्र उपजिल्हा रूग्णालयात देण्यासाठी सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षाला मान्यता नसल्यामुळे टाळे लागले असून अपंगाना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परभणी जिल्हा रूग्णालयाची वारी अनिवार्य झाली आहे. 
तालुक्यातील अस्थिव्यंग रूग्णांना अपंगाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी परभणी येथील रूग्णालयात जावे लागते. त्यासाठी सेलूतील उपजिल्हा रूग्णालयातच अस्थिव्यंग अपंगाना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून या केंद्राला मान्यता मिळाली नसल्यामुळे या केंद्रातून एकाही अपंगाला प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अस्थिव्यंग अपंगाना प्रमाणपत्र काढण्यासाठी परभणी येथील जिल्हा रूग्णालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत. उपजिल्हा रूग्णालयात अस्थिव्यंग अपंगांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र केंद्राचे उदघाटन आ. विजय भांबळे यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी झाले होते. प्रत्येक शनिवारी अस्थिव्यंगांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्याची सुविधा करण्यात आली होती. परंतु, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे तालुक्यातील अपंगाना या केंद्रातून प्रमाणपत्र मिळू शकले नाही. 
आरोग्य विभागाच्या परवानगी पूर्वीच अपंग प्रमाणपत्र केंद्र सुरू करण्याचा खटाटोप संबंधितांनी केला. मात्र यात अपंगांची फरफट झाली. अस्थिव्यंग अपंगांना उपजिल्हा रूग्णालयात अपंगाचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करणे संबंधी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला होता. परंतु, सुरू करण्यात आलेल्या केंद्राला मान्यता मिळाली नाही. विशेष म्हणजे, मान्यता येण्यापूर्वीच हे केंद्र सुरू करून अपंगाचे एक शिबीरही घेण्यात आले. तालुक्यातील जवळपास १७ अस्थिव्यंग अपंगानी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या केंद्रात सर्व दस्तावेज दाखल केले होते. परंतु, केंद्राला मान्यताच नसल्यामुळे या अपंगांना प्रमाणपत्र काढण्यासाठी परभणीला जावे लागणार आहे. 
दरम्यान, अस्थिव्यंग अपंगाना प्रमाणपत्र उपजिल्हा रूग्णालयात मिळत असल्याची चर्चा झाली. त्यानंतर शेकडो अस्थिव्यंग अपंगानी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली. परंतू रूग्णालयातून त्यांना परभणीला जाण्याचा सल्ला मिळाल्या नंतर अस्थिव्यंग अपंगांची घोर निराशा झाली आहे.

 ■ उपजिल्हा रूग्णालयात अस्थिव्यंग अपंगांना प्रमाणपत्र देण्यासाठी तीन सदस्यीय समितीही स्थापन केली होती. या समितीत वैद्यकिय अधिक्षक, अस्थिरोगतज्ज्ञ व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, राज्यात ३८ केंद्र असल्यामुळे नवीन केंद्राला मान्यता मिळाली नाही, असे सूत्रांनी सांगितले. उपजिल्हा रूग्णालयात अस्थिव्यंग अपंगाना प्रमाणपत्र केंद्र सुरू करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. १७ अस्थिव्यंग अपंगानी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रात दस्तावेज दाखल केले आहेत. हे दस्तावेज जिल्हा रूग्णालयात पाठवून त्यांना त्याठिकाणाहून प्रमाणपत्र मिळणार आहे. 
-डॉ. नरेंद्र वर्मा, वैद्यकीय अधीक्षक 

Web Title: Disability Certificate Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.