वंचित बालकांना मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:11 AM2021-02-22T04:11:27+5:302021-02-22T04:11:27+5:30
परभणी : जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपासून इंद्रधनुष्य अभियान राबविले जाणार असून, दोन वर्षांच्या आतील ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे, अशा ...
परभणी : जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपासून इंद्रधनुष्य अभियान राबविले जाणार असून, दोन वर्षांच्या आतील ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे, अशा एक हजार १५६ बालकांना लसीकरण केले जाणार आहे.
दरवर्षी जिल्ह्यातील आरोग्य विभाग दोन वर्षांच्या आतील बालकांसाठी लसीकरण मोहीम राबिवतो. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांतून या बालकांना लस दिली जाते. मात्र, मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आले. त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. शिवाय, कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने अनेक बालके लसीकरणापासून वंचित राहिले होते. डिसेंबर महिन्यापर्यंत पाल्यांनी घराबाहेर पडून बाळाला लस देण्याचे टाळले. त्यामुळे दोन वर्षांपर्यंतच्या बाळांना द्यावयाचे लसीकरण रखडले होते. राज्य शासनाने डिसेंबर महिन्यात वंचित बालकांना लसीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने ठिकठिकाणी शिबिरे घेऊन बालकांना लसीकरण करून घेतले. जिल्ह्यात सुमारे ३३ हजार ७०२ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. आरोग्य विभागाने डिसेंबर महिन्यातच २६ हजार २२० बालकांना लसीकरण केले होते.
आता राज्य शासनाने इंद्रधनुष्य अभियान सुरू केले आहे. या काळात लसीपासून वंचित राहिलेल्या बालकांना लसीकरण केले जाणार आहे. २२ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात हे अभियान राबविले जाणार आहे. आरोग्य विभागाने त्यासाठी तयारी केली असून, प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण केंद्र स्थापन करून लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आता या अभियानात विविध लसींपासून वंचित राहिलेल्या बालकांना लसीकरण केले जाणार आहे.
दोन वर्षांपर्यंत विविध लस
बाळ जन्माला आल्यानंतर ते दोन वर्षांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लसी ठरावीक अंतराने दिल्या जातात. त्यातील बीसीजी, पोलिओ, डीपीटी, मेंदूज्वर आदी लसींचा समावेश असतो. दोन वर्षांच्या काळात लसींचे हे डोस पूर्ण करावयाचे असतात. या लस दिल्यानंतर आजारांपासून बालकांचे संरक्षण होते.
९३ ठिकाणी लसीकरण
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक अंतर्गत रुग्णालये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी अंतर्गत रुग्णालयांत ९३ केंद्रांवर ५७८ बालक आणि ५२ गरोदर मातांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सोमवारपासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत बालकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन केले जाणार आहे. दोन वर्षांपर्यंत ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे, अशा बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.