दसऱ्यात निराशा, आता फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत नुकसान भरून निघण्याची आशा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:40 PM2023-11-11T12:40:50+5:302023-11-11T12:41:13+5:30

शेतकऱ्यांची सारी आशा दिवाळी सणावर आहे. 

Disappointment in Dussehra, hope of Diwali recovery for flower farmers | दसऱ्यात निराशा, आता फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत नुकसान भरून निघण्याची आशा 

दसऱ्यात निराशा, आता फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत नुकसान भरून निघण्याची आशा 

- प्रशांत मुळी
येलदरी वसाहत :
पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परिसरातील आंबरवाडी शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर परवडणारी फुल शेती निवडली आहे.सुरुवातीची तोडणी साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर केली जाते. परंतु यावर्षी दसऱ्यात झेंडूस कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच निराशा झाली. यामुळेच आता शेतकऱ्यांची सारी आशा दिवाळी सणावर आहे. 

यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे रब्बीची आशा मोठ्या प्रमाणात धूसर होत चालली आहे. असे असताना यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुल शेतीचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी या अनुषंगाने फुल उत्पादकांनी झेंडू लावला. दररोज झेंडूच्या विक्री मध्ये शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर दसऱ्यापर्यंत मिळाले. शेतकऱ्यांनी दसऱ्यानिमित्त झेंडू फुले मुंबई,हैद्राबाद,पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी मोठ्या शहरांमध्ये विक्रीस नेली होती. आदल्या दिवशी ३० ते ४० रुपये प्रति किलोने विकला गेलेला झेंडू दसऱ्याच्या दिवशी मात्र पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली घसरला. यामुळे अनेकांनी फुलाचा ढीग तसाच सोडलयाने दसरा त्यांच्यासाठी नुकसानीचा ठरला. आता सगळ्यात मोठा सण दिवाळी आला आहे. या सणासाठी शेतकऱ्यांनी फुले तोडणी करून मराठवाड्यासह राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक या शहरांकडे पाठवला आहे. शेतकऱ्यांनी फुल शेतीसाठी खूप मेहनत घेतली असून चार वेळा कीडनाशक फवारणी केली आहे. त्यात पुन्हा वन्यप्राणी उपद्रव करत असल्याने शेतकरी दिवसरात्र शेतातच होता. तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे अधिकची मजुरी देऊन फुल तोडणी करावी लागली आहे. यामुळे दिवाळीला तरी लक्ष्मी पावेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. 

नुकसान भरून निघावे
झेंडू फुलांना सध्या ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. दीपावलीच्या मुहूर्तावर यात १० ते २० रुपये वाढ झाल्यास मागील नुकसान भरून काढण्यासाठी मदत होईल. 
- अर्जुन घुगे, फूल शेतकरी, आंबरवाडी

Web Title: Disappointment in Dussehra, hope of Diwali recovery for flower farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.