येलदरीतून तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग; मुसळधार पावसाने अनेक मार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 PM2021-09-25T16:30:42+5:302021-09-25T16:31:13+5:30
rain in Parabhani : येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने धरण प्रशासनाला पूरनियंत्रण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
येलदरी (ता.जिंतूर) : येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील अनेक मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शिवाय येलदरी प्रकल्पातून मागच्या तीन दिवसांपासून दहाही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे.
येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने धरण प्रशासनाला पूरनियंत्रण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. येलदरी धरणाचे दहाही दरवाजे तीन दिवसांपासून सुरू असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात केला जात आहे. या मुळे येलदरी धरणाखालील पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान येलदरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच येलदरी- जिंतूर हा राज्य रस्ता तीन तासाहून अधिक वेळ बंद राहिला. तसेच येलदरी- इटोली या रस्त्यावर देखील हिवरखेडा गावजवळ ओढयाला पूर आल्याने हिवरखेडा, सावळी, घडोळी, रामप्रसादनागर, दिग्रस, ढाबा, इटोली, मांडवा ,खोलगडगा आदी १० गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. ७ सप्टेंबरपासून पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातुन पूर्णा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे.पूर्णा प्रकल्पात वर्षात सरासरी ६५० ते ७५० मिमी पाऊस होतो. यावर्षी धरण परिसरात ११४० मिमी एवढा प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसरात पावसाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
पिकांना बसला फटका
या पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला असून, खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.