वादग्रस्त ८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:31+5:302020-12-05T04:27:31+5:30
परभणी : येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गैरप्रकाराशी संबंधित असलेल्या ब्रिक्स इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या ...
परभणी : येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गैरप्रकाराशी संबंधित असलेल्या ब्रिक्स इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या ८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
परभणी येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यलयात दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला होता. खाजगी दलालांमार्फत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची बाब समोर आली होती. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे हे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यस्तरावर चर्चेत आले होते. जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. यासाठी मे. ब्रिक्स इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या वतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले होते. याप्रकरणी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे नोव्हेंबर २०१९ मध्ये चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार समाजकल्याण विभागाच्या वतीने चौकशी करण्यात आली. त्यामध्ये तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानंतर ब्रिक्स इंडिया प्रा.लि. कंपनीअंतर्गत कार्यरत असलेल्या ८ कर्मचाऱ्यांची सेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने समाप्त करण्यात आली. तशी माहिती समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
बीव्हीजीचे कर्मचारी कार्यरतच
जिल्हा जात पडताळणी समित्यांना गैरप्रकाराचा ठपका असलेल्या बीव्हीजी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, असे समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वी ज्या कर्मचाऱ्यांवर गैरप्रकारचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याच ८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यानंतर पुन्हा याच कंपनीला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतील काम देण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ३ पदे वगळता इतर सर्व कर्मचारी कंत्राटी स्वरूपात खाजगी कंपनीमार्फत नियुक्त करण्यात आले आहेत.