३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:04+5:302021-09-17T04:23:04+5:30
पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्हा दौऱ्यावर आले असता १६ सप्टेंबर रोजी जिंतूर व सेलू तालुक्यातील अडी अडचणींबाबत आढावा बैठक ...
पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्हा दौऱ्यावर आले असता १६ सप्टेंबर रोजी जिंतूर व सेलू तालुक्यातील अडी अडचणींबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना, जि. प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे, जि. प.चे उपाध्यक्ष अजय चौधरी, सभापती रामराव उबाळे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व बँक व्यवस्थापक उपस्थित होते. पालकमंत्री मलिक म्हणाले, सर्व बँकेच्या जिल्हा व्यवस्थापक तसेच अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे येत्या १५ दिवसांत मंजूर करावीत. शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे प्रत्येक पिकासाठीचे कर्ज देणे गरजेचे आहे. सेलू-जिंतूर तालुक्यातील येलदरी, चारठाणा, भोगाव, आडगाव, कौसडी, बामणी, वालूर, चिकलठाणा येथे नवीन राष्ट्रीयीकृत बँका सुरू करणे व १ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना पालकमंत्री मलिक यांनी दिल्या. यावेळी माजी आमदार विजय भांबळे, जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी तालुक्यातील विविध समस्या व शेतकऱ्यांचे प्रश्न पालकमंत्री मलिक यांच्यासमोर मांडले.