१० हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:25+5:302021-01-02T04:14:25+5:30
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात ...
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २८ डिसेंबरपर्यंत बँकांच्या उदासीन भूमिकेमुळे केवळ ९ हजार ८६१ शेतकऱ्यांनाच ५३ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे या रबी हंगामात तरी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना दिले होते. या बँकांनी मात्र केवळ ६६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले होते. खरीप हंगामातून हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे आता रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्वाधिक ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे. रबी पेरणीचा हंगाम पूर्ण झाला आहे. मात्र, २८ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ९ हजार ८६१ शेतकऱ्यांना ५३ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खाजगी बँकांचा आखडता हात
यावर्षीच्या रबी हंगामात जवळपास १० हजार शेतकऱ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत पीककर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये खाजगी बँकांनी १८५ शेतकऱ्यांना २ कोटी ९४ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार १३२ शेतकऱ्यांना १८ कोटी ५१ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३ हजार ४२१ शेतकऱ्यांना १५ कोटी ९८ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक बँकांनी २ हजार १२३ शेतकऱ्यांना १५ कोटी ९९ लाख रुपयांचा लाभ दिला आहे.