अतिवृष्टी निधीचे तालुक्यांना वितरण; पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के मदत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 02:58 PM2020-11-12T14:58:03+5:302020-11-12T14:59:52+5:30
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ६७५ शेतकऱ्यांच्या १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
परभणी : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या ९० कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा निधी सर्व तालुक्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी तातडीने वितरित केला आहे.
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ६७५ शेतकऱ्यांच्या १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला १८० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. या संदर्भातील मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनाने जिल्ह्याला ९० कोटी ५१ लाख ३४ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने कारवाई करीत नऊही तालुक्यांना ९० कोटी ५१ लाखांपैकी ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे.
उर्वरित निधी याच लेखाशिर्षातंर्गत प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने वापरण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात काढलेल्या आदेशात ९० कोटी २० लाखांपैकी ६१ कोटी ३५ लाख ५९ हजार रुपयांचा निधी एसडीआरएफच्या दराने ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यासाठी वितरित केला आहे. तर २८ कोटी ८५ लाख २९ हजार रुपयांचा निधी वाढीव दराने शेती पिकांसाठी ३ हजार २०० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी ७ हजार रुपये प्रति हेक्टर दराने मदत देण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. जि्ल्हाधिकाऱ्यांनी वितरित केलेला निधी पात्र सर्व लाभार्थ्या्च्या खात्यावर मागणीच्या प्रमाणात ५० टक्के जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
शेतकऱ्यांना आता पीक विम्याची प्रतीक्षा
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने ५० टक्के निधी आता वितरित केला आहे. उर्वरित ५० टक्के निधी दिवाळीनंतर वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत मिळणार आहे. याशिवात पीक विमा कंपनीकडूनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळणार आहे. जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर जमिनीवरील पीक रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे संरक्षित केले आहे. त्यामध्ये २ लाख ४० हजार ३३ हेक्टरवरील सोयाबीन तर २३ हजार ६६७ हेक्टरवरील कापूस पिकाचा समावेश आहे. याशिवाय १५ हजार १६९ हेक्टरवरील उडीद, ३९ हजार ५७२ हेक्टरवरील मूग पिकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रिलायन्स विमा कंपनीकडे ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपयांचा हप्ता भरला आहे. आता जिल्ह्यातील बहुतांश भागातील पिकांचे अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे संरक्षित केलेल्या पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. रिलायन्स विमा कंपनी ही मदत कधी वितरित करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.