साडेचार हजार मातांना पावणे दोन कोटींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:47 AM2020-12-04T04:47:43+5:302020-12-04T04:47:43+5:30
जिंतूर (ज्ञानेश्वर रोकडे) : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांत तालुक्यातील ४ हजार ६२७ मातांना १ कोटी ८७ ...
जिंतूर (ज्ञानेश्वर रोकडे) : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांत तालुक्यातील ४ हजार ६२७ मातांना १ कोटी ८७ लाख ३३ हजार रुपयांच्या निधीचे ३ डिसेंबरपर्यंत वितरण करण्यात आले असल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिल्या अपत्याच्या वेळी गरोदर माता व स्तनदा मातांना ६ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते. १ जानेवारी २०१७ पासून ही योजना देशभरात लागू करण्यात आली आहे. मजूर महिलांना गर्भावस्थेत असताना विश्रांतीसह पोषण आहार व्यवस्थित मिळावा, या दृष्टिकोणातून ३ टप्प्यांत ही मदत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मातांना आरसीएचच्या पोर्टलवर नोंद करावी लागणार आहे. शिवाय गरोदरपणाच्या सहा महिन्यांत किमान एक वेळा प्रसूतीपूर्व तपासणी आरोग्य संस्थेत करणे आवश्यक आहे. प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद, त्याचे लसीकरण करणे आवश्यक आहे. जानेवारी २०१७ ते ३ डिसेंबर या ३ वर्षांच्या कालावधी जिंतूर तालुक्यात ४ हजार ६२७ मातांना या योजनेचा लाभ मिळाला. याअंतर्गत १ कोटी ८७ लाख ३३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ३ डिसेंबर या कालावधीत ६१९ गरोदर मातांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यांना ३० लाख ६ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तालुक्यात या योजनेचे समाधानकारक काम झाले आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, माता व बाल संरक्षण कार्ड यांची प्रत द्यावी, पतीचे आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स देणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यांत मदत दिली जाते. लाभार्थी मातांची प्रसूती सुयोग्य पद्धतीने व्हावी, या दृष्टिकोणातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने व मृत्यूदर रोखता यावा, या दृष्टिकोणातून हे अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येते.
जिंतूर तालुक्यात मातृवंदना योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेसाठी प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तात्काळ लाभार्थी मातांच्या आधार लिंक बँक खात्यावर अनुदानाचा पहिला हप्ता जमा करण्यात येतो. तालुक्यात सद्य:स्थितीत एकही प्रस्ताव प्रलंबित नाही.
डॉ. दिनेश बोराळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिंतूर