जिल्हा रुग्णालयाचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:03+5:302021-01-14T04:15:03+5:30
जिल्हा रुग्णालयासमोरील अतिक्रमण ७ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी एस. पी. सिंग यांनी काढले होते. त्यानंतर समोरील बाजूस अतिक्रमण नसले, तरी ...
जिल्हा रुग्णालयासमोरील अतिक्रमण ७ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी एस. पी. सिंग यांनी काढले होते. त्यानंतर समोरील बाजूस अतिक्रमण नसले, तरी रुग्णालयाच्या परिसरात खासगी रुग्णवाहिकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अनुषंगाने बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास रुग्णालय परिसराची पाहणी केली असता, बाह्य रुग्ण विभागासमोरील बाजूस प्रवेशद्वाराला खेटूनच एक खासगी रुग्णवाहिका उभी असल्याचे दिसून आले. तसेच रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अतिदक्षता विभागासमोर ऑक्सिजनचे सिलिंडर प्रवेशद्वारावरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत रुग्ण आल्यानंतर त्याला या कक्षात उपचारासाठी नेताना संबंधितांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. तसेच विशेष नवजात शिशू व अतिदक्षता कक्षाच्या प्रवेशद्वारावरच चॅनल गेटच्यामध्ये आडवा स्ट्रेचर टाकण्यात आला होता. त्याच्या बाजूस अन्य साहित्य टाकण्यात आले होते. त्यामुळे येथेही आपत्कालीन स्थितीत कसा प्रवेश करायचा? असा सवाल निर्माण झाला आहे. स्त्री रुग्णालयासमोर तसेच जळीत वाॅर्डाच्या परिसरालाही खासगी वाहनाने वेढा टाकल्याचे दिसून आले. ही वाहने अधिकाऱ्यांसमोरच ये-जा करीत असताना ते मात्र याप्रकरणी लक्ष देत नसल्याचे पाहावयास मिळाले.
जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत मॉकड्रिल झाले नाही
जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने करावयाच्या तयारीबाबत आतापर्यंत एकदाही संबंधित प्रशासनाकडून मॉकड्रिल करण्यात आले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
आपत्कालीन मार्ग बंद
आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यासाठी प्रमुख विभागात मार्गच दिसून आला नाही. विशेष नवजात व शिशू अतिदक्षता कक्षाला एकाच बाजूने रस्ता दिसून आला. चौकशीअंती आपत्कालीन मार्ग येथे नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. खुद्द जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षालाच आपत्कालीन मार्ग नाही.