परभणी राज्यात जिल्हा २९ व्या स्थानावर : केवळ २३ कामांमधूनच स्वच्छतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:45 PM2018-09-29T23:45:49+5:302018-09-29T23:48:19+5:30
महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. यावरुन जिल्ह्यातील प्रशासकीय उदासिनताच दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. यावरुन जिल्ह्यातील प्रशासकीय उदासिनताच दिसून येत आहे.
२ आॅक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश स्वच्छ करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या मदतीने स्वच्छता हीच सेवा हे अभियान सुरु केले. राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अंतर्गत अभियान राबविले जात आहे. १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या काळात जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी स्वच्छतेची कामे करुन अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली होती. मात्र याकामी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ठिकठिकाणी स्वच्छतेची कामे हाती घेऊन स्वच्छतेचे अभियान राबविणे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागरण करणे अशा उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानाचा राज्यस्तरावरुन दररोज लेखाजोखाही घेतला जात आहे. दररोज जिल्हाभरात झालेल्या कामांची नोंद राज्यस्तरावर घेतली जात असून त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची क्रमवारी ठरविली जात आहे; परंतु, जिल्ह्यात या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एक सोपस्कर म्हणून अभियानाकडे पाहिले जात आहे. २८ सप्टेंबर रोजी राज्यस्तरावरील जिल्ह्यांच्या कामगिरीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये परभणी जिल्हा राज्यात २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात स्वच्छतेची केवळ २३ कामे झाली. त्यामुळे स्वच्छता ही सेवा हा केवळ सोपस्कार म्हणून राबविला जात असल्याचे दिसत आहे. परिणामी या अभियानाला थंड प्रतिसाद मिळत आहे.
परभणी जिल्ह्यातूनच अभियानाची सुरुवात
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यात सुरु केलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचे उद्घाटन परभणी जिल्ह्यातूृन झाले होते, हे विशेष.
१५ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परभणी येथे राज्यातील या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे अभियानाला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते मात्र परभणी जिल्ह्यातच थंड प्रतिसाद मिळत आहे.
नाशिक जिल्हा राज्यात अव्वल
स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत राज्यात नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. हा जिल्हा राज्याच्या क्रमवारीत क्रमांक एकवर आहे. या अभियानामध्ये २८ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यात स्वच्छतेची तब्बल ३४५० कामे झाली आहेत. सातारा जिल्हा दुसºया क्रमांकावर असून या जिल्ह्यात १२२५ कामे झाली. मराठवाड्यात मात्र अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक ८२ कामे झाली असून हा जिल्हा राज्याच्या क्रमवारीत १९ व्या स्थानावर आहे. ६१ कामांसह लातूर जिल्हा २० व्या, ५० कामांसह हिंगोली जिल्हा २१ व्या क्रमांकावर आहे. नांदेड जिल्ह्यात ३७ कामे झाली असून औरंगाबाद जिल्ह्यात २८ कामे झाली आहेत. औरंगाबाद राज्याच्या क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर आहे. तर जालना जिल्हा ३५ व्या क्रमांकावर आणि उस्मानाबाद जिल्हा ३६ व्या क्रमांकावर आहे.