मृदा आरोग्यासाठी व्यापक संशोधन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:10+5:302020-12-09T04:13:10+5:30
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा - परभणीच्या वतीने ‘बदलत्या हवामानातील अद्यावत शेतीत ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा - परभणीच्या वतीने ‘बदलत्या हवामानातील अद्यावत शेतीत मृदा आरोग्य व्यवस्थापनाचा नावीण्यपूर्ण दृष्टीकोन’ या विषयावर ५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान दर रविवारी ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले. ६ डिसेंबर रोजी समारोप कार्यक्रम प्रसंगी डॉ.चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण तर प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेचे माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी, भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या परभणी शाखेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सय्यद इस्माईल, सचिव डॉ. प्रवीण वैद्य आदींची उपस्थिती होती.
डॉ. चौधरी म्हणाले, कृषी संशोधन व विस्तार संबंधित पुस्तकरुपी ज्ञान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचण्यासाठी प्रभावी विस्तार कार्य आवश्यक आहे. खतांची कार्यक्षमता वाढवून प्रति हेक्टरी रासायनिक खताचा वापर कमी करण्यास वाव असल्याचे मत त्यांना व्यक्त केले. डॉ. एस.पी. वाणी म्हणाले, मृद शास्त्रज्ञानी संशोधना बरोबर कृषी विस्तार कार्यामध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक असून कृषी संशोधन व कृषी विस्तार या दोन गोष्टींना प्राध्यान्य देणे गरजेचे आहे. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, कोरोना रोगाच्या प्रादुर्भावात आयोजित व्याख्यानमालेमुळे मातीच्या आरोग्याबाबत शेतकरी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त माहिती मिळाली. शाश्वत शेती क्षेत्रात हवामानावर अधारित स्मार्ट तंत्राचा शेतकऱ्यांनी योग्य उपयोग केल्यास उत्पादना वाढ होईल, असे मत व्यक्त केले. डॉ. सय्यद इस्माईल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या परभणी शाखेचे सचिव डॉ. प्रवीण वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पपिता गौरखेडे यांनी सूत्रसंचालन केले.
या व्याख्यानमालेत देशातील नामांकित संस्थांचे शास्त्रज्ञ डॉ डी.के. पाल, डॉ. एस.पी. वाणी, डॉ. ए.के. पात्र, डॉ. पी. चंद्रशेखरराव, डॉ. सी. श्रीनिवासराव, डॉ. डी.एल.एन. राव, डॉ.दीपक रंजन बिस्वास, डॉ. देबाशीस चक्रवर्ती, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. सुरेशकुमार चौधरी आदींची व्याख्याने झाली.