दररोज किमान २५ तपासण्या करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:16+5:302021-03-14T04:17:16+5:30
परभणी : जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज किमान २५ आरटीपीसीआर तपासण्या कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ...
परभणी : जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज किमान २५ आरटीपीसीआर तपासण्या कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मार्च रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीत दररोज होणाऱ्या एकूण तपासण्या, कोरोना प्रतिबंधक लसीकरण, नवीन रुग्णांच्या नोंदी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग याविषयीचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुगळीकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची गती कमी आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी दररोज एक उपकेंद्र नेमून गावातील सर्व लाभार्थींचे लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी आशा स्वयंसेविकांची मदत घ्यावी. नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान ३० जणांची यादी तयार करून त्यांची तपासणी करून घ्यावी, कोरोनाबाधित रुग्णांची माहिती वेळेत पोर्टलवर अपलोड करावी, जिल्हा रुग्णालय आणि इतर रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करावी त्याचप्रमाणे आरटीपीसीआरचे नमुने घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.