डॉक्टर पतीने प्रेमिका परिचारिकेला घरी बोलावले अन गावी गेलेली पत्नी मध्यरात्री धडकली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 08:09 PM2021-02-02T20:09:52+5:302021-02-02T20:18:34+5:30
Cheating Husband crime news २७ जानेवारी २०२१ रोजी फिर्यादीची तब्येत बरोबर नसल्याने तिचे आई-वडील तिला रुग्णालयात दाखविण्यासाठी औरंगाबाद येथे घेऊन गेले होते
जिंतूर : पत्नी घरी नसल्याची नामी संधी साधत तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या आपल्या प्रेमिकेला भेटण्यासाठी घरी बोलावले; परंतु पत्नीने वडील व भावासोबत रात्री येलदरी गाठून परिचारिका व पतीस रंगेहात पकडले. त्यानंतर पत्नीच्या फिर्यादीवरून पती व त्याच्या प्रेमिकेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
पीडित पत्नीने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डॉ. कैलास काशिनाथ पवार यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी पती डॉ. कैलास पवार, सासरा काशिनाथ पवार, सासू गोदावरी पवार, दीर किशोर पवार, नणंद कविता पवार यांनी संगनमत करून, तू दिसायला चांगली नाहीस, लग्न आमच्या मनाप्रमाणे झाले नाही’, असे म्हणून छळ सुरू केला. तसेच गाडी घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण केली. सासरा काशिनाथ पवार व दीर किशोर पवार यांनीही शरीरसुखाची मागणी केली.
२७ जानेवारी २०२१ रोजी फिर्यादीची तब्येत बरोबर नसल्याने तिचे आई-वडील तिला रुग्णालयात दाखविण्यासाठी औरंगाबाद येथे घेऊन गेले असता, पत्नी घरी नसल्याची संधी साधत तिचा पती डॉ. कैलास पवार याने परिचारिका प्रेमिका वनीता आकाश कानगुले (राजे) हिला येलदरी येथे बोलावून घेतले. ही माहिती विवाहितेला मिळाल्याने ३१ जानेवारी रोजी रात्री वडील व भावासोबत ती येलदरी येथे घरी आली, तेव्हा तिला घर आतून बंद दिसले. तिचा भाऊ घराच्या छतावरून आत उतरला असता, त्यास दोघेही घरात आढळले.
दरवाजा उघडताच फिर्यादी महिला घरात गेली असता, तिला तिचा नवरा डॉ. कैलास पवार व त्याची प्रेमिका वनीता कानगुले हे दोघे नको त्या अवस्थेत आढळून आले. याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. कैलास पवार, सासरा काशिनाथ पवार, सासू गोदावरी पवार, किशोर पवार, नणंद कविता पवार यांच्याविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीची पावले उचलत रात्रीच डॉ. कैलास पवार व त्याची प्रेमिका वनीता कानगुले या दोघांना ताब्यात घेतले आहे.