वर्षभर दोडक्याची शेती ठरतेय लाभदायी; दररोज मिळतेय भरघोस उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 07:11 PM2020-10-23T19:11:01+5:302020-10-23T19:14:05+5:30
दोडका शेतीत आंतर पिके घेऊन उत्पन्नात आणखी वाढ करण्यात आली आहे.
परभणी : सोनपेठ तालुक्यातील शिरसी येथील प्रल्हाद शेषराव फले या शेतकऱ्यांने शेतीमध्ये वेगळे प्रयोग करीत वर्षभर दोडक्याची लागवड केली आहे. यातून ते दररोज उत्पन्न घेत असून त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये नुकसान होण्याचे प्रकार दरवर्षी होत आहेत; मात्र शेतीत थोडे वेगळे प्रयोग केले तर निश्चित असे उत्पन्न मिळू शकते हे प्रल्हाद शेषराव फले यांनी दाखवून दिले आहे. प्रल्हाद फले यांना शिर्शी परिसरात १५० एकर शेती आहे. शेतीत आवड असल्याने प्रल्हाद फले सातत्याने नवनवीन प्रयोग करतात. दोडका लागवडीचा त्यांचा प्रयोग शेतकऱ्यांना चालना देणारा आहे. अडीच एकर शेतीत ड्रीपच्या साह्याने त्यांनी दोडक्याची लागवड केली आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर, जानेवारी ते एप्रिल आणि मे ते ऑगस्ट असे एका वर्षात तीन वेळा दोडक्याचे उत्पन्न घेतले जाते. उत्पादित दोडका परभणी, गंगाखेड आणि परळी येथील बाजारपेठेत विक्री केला जातो. यात प्रत्येक हंगामात सुमारे साडेआठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पारंपरिक पिकात उत्पन्नासाठी चार महिने प्रतीक्षा करण्यापेक्षा दररोज उत्पन्न देणारी ही शेती फायद्याची असल्याचे फले यांनी सांगितले.
आंतर पिकांतूनही उत्पन्न
दोडका शेतीत आंतर पिके घेऊन उत्पन्नात आणखी वाढ करण्यात आली आहे. दोडका शेतीत मिरची, पत्ता कोबी, बेडवर मेथी, कोथंबीर ही पिके घेण्यात आली. त्यामुळे जवळच्या बाजारपेठेत या भाजीपाल्याची विक्री करून उत्पन्नात भर घालता येते.
मेहनत घ्यावी लागते
दोडक्याची शेती निश्चितच फायद्याची ठरते. मात्र यात मेहनत भरपूर घ्यावी लागते. संपुर्ण पिकासाठी ड्रीप केले आहे. तीन ते चार दिवसाआड फवारणी, दोन दिवसाआड खत द्यावे लागते,असे फले यांनी सांगितले.