कोणी लस देता का लस...? आठ दिवसांपासून सरकारी रुग्णालयांमध्ये लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:34+5:302021-07-23T04:12:34+5:30
परभणी : जिल्ह्यात आठ दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवावे लागत असून, नागरिकांना ...
परभणी : जिल्ह्यात आठ दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवावे लागत असून, नागरिकांना मात्र ताटकळत थांबावे लागत आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिक पुढाकार घेत असले तरी आता लस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाला हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. दररोज १० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आरोग्य विभागात आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन दिवसांतून एक वेळा १२०० ते १५०० डोस मिळत आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांमध्ये तर दोन महिन्यांपासून लसच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचा दुसरा डोस रखडला आहे. लसीचा साठा वाढवावा आणि वेळेत लसीकरण पूर्ण करून घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
हेच का मोफत लसीकरण ?
लसीचा दुसरा डोस घेण्याची तारीख निघून गेली आहे. मोबाईलवर वारंवार संदेशही येत असून, लस घेण्याचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात लस उपलब्ध नसल्याने अडचण झाली आहे.
- सुनीता दामोशन
लसीकरण करण्याची इच्छा आहे. त्यासाठी दररोज केंद्रावर जाऊन लस उपलब्ध झाली का? ते पाहावे लागते. मात्र, आठ दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही लसीकरण करता आले नाही.
- पूजा जोशी
जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ एक ते दीड हजार डोसेस पाईपलाईनमध्ये उपलब्ध असून, दररोज ग्रामीण भागात मोजक्याच केंद्रांवर लसीकरण होत आहे.
खासगी रुग्णालयांना लस विकत घेण्याचे बंधन शासनाने घातले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात एकाही खासगी रुग्णालयात लस उपलब्ध नाही.
राज्यस्तरावरून ज्या प्रमाणात लसीचा पुरवठा होतो, त्यानुसार लसीकरण केले जात आहे. मागील आठ दिवसांपासून तुटवडा जाणवत आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लसीकरण केंद्रे सुरू केली जातील.
- डॉ. रावजी सोनवणे, लसीकरण प्रमुख