पावसाचा अन् नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबंध असतो का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:48+5:302021-08-02T04:07:48+5:30
परभणी : यावर्षी जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. ...
परभणी : यावर्षी जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. मात्र तरीही शहरात पाण्यासाठी ओरड सुरुच आहे. त्यामुळे पावसाचा आणि नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबंध असतो का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे,
धरणात पाणीसाठा नसल्यास कायम पाणी टंचाई जाणवते; मात्र मागच्या काही वर्षांपासून धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही नागरिकांना मात्र आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी वितरणाचे नियोजन कोलमडलेले असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. परभणी शहराला येलदरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पात सध्या ७४ टक्के पाणीसाठा आहे. असे असताना परभणीकरांना मात्र पाण्यासाठी आठ-आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
येलदरीत ७४ टक्के पाणीसाठा तरीही शहराला आठ दिवसाआड पाणी
परभणी शहराला जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. समाधानकारक पाऊस झाल्याने या प्रकल्पात सध्या ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे; मात्र शहरातील सर्वच भागात आठ ते दहा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे.
मागील दोन वर्षांपासून शहरातील पाणी वितरणाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना नियमित पाणी उपलब्ध होत नाही. जी स्थिती उन्हाळ्यात तीच स्थिती पावसाळ्यातही आहे.
महानगरपालिकेने नियोजन करुन पाणी वितरणाचे नियोजन करावे आणि शहरवासीयांना किमान दोन दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासीयांतून केली जात आहे.
का मिळत नाही शहरवासीयांना नियमित पाणी
आम्ही महिनाभरापूर्वी नवीन नळ जोडणी घेतली आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र नळ जोडणी घेतल्यानंतर केवळ एक वेळा दहा मिनिटे पाणी आले. त्यामुळे पाण्यासाठी केलेला खर्च वाया जात आहे.
विनोद फुलपगार
जुन्या जलवाहिनीला पाणी येत नसल्याने नवीन जलवाहिनीवर नळ जोडणी घेतली आहे; मात्र अद्याप नळाला पाणी आले नाही. आमच्या भागात नियमित पाणी सोडले जात नाही. त्यामुळे नवीन नळ जोडणी व खर्च करुनही पाणीपुरवठा मात्र विस्कळीत झालेलाच आहे.
सतीश महामुनी
अतिपावसाने पिकांचे नुकसान
मागील महिन्यात दोनदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने पिके पाण्याखाली गेली असून, शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन त्वरित नुकसानभरपाई द्यावी.
- नरसिंग ढेंबरे, कुंभारी
आमच्या भागात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यावेळी पिके जोमात होती. त्यामुळे यंदा सुगी चांगली येणार अशी अपेक्षा होती. मात्र मागच्या महिन्यात दोन वेळा अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. ओल वाळत नसल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. राजू नवघरे, कुंभारी
जिल्ह्यात झालेला पाऊस
परभणी : ५९९
गंगाखेड : ५०१
पाथरी : ६१४
जिंतूर : ५६१
पूर्णा : ६१४
पालम :५७२
सेलू :५५८
सोनपेठ : ५९१
मानवत : ५७१
एकूण : ५७६
प्रकल्पाचा साठा
प्रकल्प : साठा उपयुक्त टक्केवारी
येलदरी ७२३ ५९८ ७३.६१
मध्यम : ५८.८६ ४३.८५ ५१
लघू : २१.५७ १७.४२ ४१