प्रचाराला सहाजण आल्यास दारात उभे करू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:25+5:302021-01-13T04:41:25+5:30
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. त्यापैकी ६८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या असून उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रचार सध्या अंतिम ...
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. त्यापैकी ६८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या असून उर्वरित ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढवला आहे. यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. यात कॉर्नर बैठकांबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारासह फक्त पाचजणांनाच घरोघरी जाऊन प्रचाराची परवानगी दिली आहे. असे असताना ग्रामीण भागात या नियमांचे उल्लंघन करून १० ते ५० जणांचे घोळके घरोघरी फिरताना दिसून येत आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन होत असताना याकडे पाहण्यास प्रशासकीय यंत्रणेला वेळ मिळालेला नाही. शिवाय प्रचाराच्या रणधुमाळीत आचारसंहितेची अंमलबजावणी करणारी पथकेही दिसून येत नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाचे नियम जिल्ह्यात कागदावरच दिसत आहेत.
बोरी
जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. येथे उमेदवारासह १० ते १२ जण एकत्र घरोघरी प्रचार करताना मंगळवारी दिसून आले.
चिकलठाणा बु.
सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु. येथे ९ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. येथे जवळपास ३५ ते ४० जणांचा समूह घरोघरी जाऊन प्रचार करताना मंगळवारी दिसून आला.
वालूर
सेलू तालुक्यातील वालूर येथे १७ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथेही उमेदवारासह १० ते १५ जण एकत्र घरोघरी प्रचार करताना मंगळवारी दिसून आले.
कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारासह ५ लोकांचा समूह घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो. या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन जिल्ह्यात कोठेही होत असेल तर संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन.