वाळू माफियांना ना भीती न चिंता; लॉकडाऊन दरम्यान तीन साठ्यातून ३२ ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 08:39 PM2020-03-29T20:39:28+5:302020-03-29T20:40:05+5:30
तारुगव्हाण परिसर; महसूल विभागाची कारवाई
पाथरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने प्रशासकीय यंत्रणा याकामी गुंतली आहे. या संधीचा फायदा घेत गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू उपसा करुन वाळू माफिया त्याचे साठे करीत आहेत. २९ मार्च रोजी तारुगव्हाण परिसरात तीन ठिकाणाहून ३२ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
पाथरी तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. उपसा केलेल्या वाळूचा नदीकाठावर साठा करण्यात येत आहे. साठा केलेल्या वाळूचा पाथरी, मानवत, परभणी आदी शहरामध्ये रात्रीच्या सुमाराला वाळू पुरवठा केला जात आहे. प्रशासनाची नजर चुकवून चढ्या दराने माफियांकडून वाळू तस्करी केली जात आहे. गोदावरी नदीकाठावर तारुगव्हाण येथे वाळूचा साठा केला जात असल्याचा प्रकार सुरु असल्याबाबत कानसूर येथील ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या अधिका-यांना माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी प्रकाश गोवंदे, तलाठी एस.एन.शिंदे यांनी तारुगव्हाण येथे साठा केलेल्या
घटनास्थळाला रविवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भेट दिली. यावेळी तारुगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात १० ब्रास, कारभारी पौळ यांच्या शेतात १० ब्रास आणि तारुगव्हाण जुन्या गावठाण परिसरात १२ ब्रास असा ३२ ब्रास वाळूसाठा मिळून आला. या पथकाने हा वाळूसाठा जप्त केला आहे. ज्याची किंमत १ लाख ६४ हजार ८०० रुपये एवढी आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेला वाळूसाठा तारुगव्हाण आणि डाकू पिंपरी येथील घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठीची कार्यवाही महसूल विभागाने गटविकास अधिकारी बी.टी. बायस यांना संपर्क साधून सुरु केली आहे.
जेसीबीने खोदले रस्ते
गोदावरीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून वारेमाप वाळू उपसा केला जात होता ;परंतु, महसूल विभागाने वाळू वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले तारुगव्हाण परिसरातील रस्ते जेसीबीने खोदून काढले आहेत.