२४ तासात उघडू शकतात येलदरी धरणाचे दरवाजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:44 PM2019-11-04T14:44:02+5:302019-11-04T14:50:30+5:30
नदी काठच्या गावांना पाटबंधारे विभागाचा सावधानतेचा इशारा
येलदरी- जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामध्ये ८६ टक्के पाणीसाठा झाला असून या प्रकल्पाचे दरवाजे उघडून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.
परतीचा पाऊस परतेना ! पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी येलदरी प्रकल्पात दाखल होत असून सोमवारी या धरणामध्ये ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.९३४ दलघमी क्षमता असलेल्या येलदरी धरणामध्ये सध्या ८१८ दलघमी पाणीसाठा झाला असून त्यात ६९३ दलघमी जीवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ८५.६९ टक्के एवढी आहे. या धरणाच्या वरील बाजुस असलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेता येत्या २४ तासात कोणत्याही क्षणी येलदरी धरणाचे दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्णा नदीला पूर येऊ शकतो. नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. बिराजदार यांनी दिला आहे.
येलदरी धरणाच्या पाण्यावर विजेची निर्मिती केली जाते. त्यामुळे दाखल होणारे पाणी सुरुवातीला वीज निर्मिती केंद्रातून सोडले जाईल. त्यानांतर पाण्याची आवक आणखी वाढल्यास मुख्य दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरणात सद्यस्थितीला होणारी पाण्याची आवक लक्षात घेता येत्या २४ तासात मुख्य दरवाजे उघडून पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.