राजीनामा द्यायचा असेल तर दिल्लीला जाऊन द्या, नाटक नको; परभणीतील शिवसैनिकच शिवसेना खासदारावर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:24 PM2020-08-27T18:24:46+5:302020-08-27T18:55:12+5:30
एकीकडे शिवसैनिकांवर अन्याय होतो म्हणून राजीनाम्याचे नाटक करायचे आणि दुसरीकडे सुडबुद्धीने शिवसैनिकांवर अन्याय करायचा हे योग्य नाही.
गंगाखेड: लोकसभा निवडणुकीसाठी जीवाचे रान करणाऱ्या शिवसैनिकांवर सुडबुद्धीने अन्याय करायचा आणि दुसरीकडे शिवसैनिकांवरच अन्याय झाल्याचा कांगावा करायचा, मग राजीनाम्याचे नाटक करायचे. राजीनामा द्यायचाच असेल तर दिल्लीला जावून द्या, अशी गंभीर टिका शिवसेनेचेच गंगाखेड विधानसभाप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब निरस यांनी खा.बंडू जाधव यांच्यावर गुरुवारी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात गळचेपी होत असल्याच्या कारणावरुन परभणीचे शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीने मात्र खा. जाधव यांचे आरोप फेटाळत भाजपाला पोषक वातावरण बनविण्यासाठी सारा खटाटोप ते करीत असल्याचा पलटवार केला होता. या वादात आता गंगाखेड बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे विधानसभाप्रमुख बाळासाहेब निरस यांनीही उडी घेतली आहे. या अनुषंगाने निरस यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात ते म्हणतात गंगाखेड बाजार समितीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास विरोध करुन खा. जाधव यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे मुदतवाढ रोखण्याचे निवेदन दिले. लोकसभा निवडणुकीत त्यांचे आम्ही काम केल्याच्या उपकाराची त्यांनी परतफेड केली. उपमुख्यमंत्री अजीत पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळून सोनपेठ, पाथरी, गंगाखेड या तिन्ही बाजार समित्यांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव सकारात्मकतेने मागवून घेतले असताना खा. जाधव यांनी राजकीय हस्तक्षेप करुन खोडा घालण्याचे राजकारण केले.
परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत यापूर्वी टोकाचा विरोध होता़ #Shivsena#NCPhttps://t.co/jCgy85v5PJ
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 26, 2020
आम्ही लोकसभेच्या वेळेस राजकीय मदत करायची आणि आमची वेळ आली की, खासदारांनी विरोध करायचा, ही संतापजनक पद्धत आहे. उलट लोकसभेला ज्यांचा प्रचार केला नाही, त्यांनी आम्हास मुदतवाढीसाठी मदत केली. त्याला दूरदृष्टीचे राजकारण म्हणतात.
एकीकडे शिवसैनिकांवर अन्याय होतो म्हणून राजीनाम्याचे नाटक करायचे आणि दुसरीकडे सुडबुद्धीने शिवसैनिकांवर अन्याय करायचा हे योग्य नाही. राजीनामा द्यायचाच असेल तर दिल्लीला जावून द्या, असेही सभापती निरस यांनी ठणकावले आहे. या अनुषंगाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या-
परभणीत राष्ट्रवादी भवन तोडफोड प्रकरणी चौघांवर गुन्हा
राष्ट्रवादीच्या गळचेपीमुळे राजीनामा देणाऱ्या खासदाराला उद्धव ठाकरेंनी केला फोन; म्हणाले...