वाहने सावकाश चालवा, मोकाट जनावरे वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:20 AM2021-09-23T04:20:29+5:302021-09-23T04:20:29+5:30
शहरातील स्टेशन रोड, नारायण चाळ, गांधी पार्क, शिवाजी चौक, क्रांती चौक, गुजरी बाजार, नानल पेठ, अपना काँर्नर, शनि मंदिर ...
शहरातील स्टेशन रोड, नारायण चाळ, गांधी पार्क, शिवाजी चौक, क्रांती चौक, गुजरी बाजार, नानल पेठ, अपना काँर्नर, शनि मंदिर रस्ता, जिंतूर रोड, स्टेडियम ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्ता, वसमत रस्ता, देशमुख हाँटेल ते देशमुख गल्ली यासह गल्ली बोळातील अनेक रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसतात. यामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून दररोज फिरते पथक काही जनावरे पकडत असले तरी प्रश्न मात्र कायमचा सुटलेला नाही.
या मार्गावर वाहने जपून चालवा
स्टेशन रोड
नारायण चाळ
गांधी पार्क
शिवाजी चौक
क्रांती चौक
गुजरी बाजार
नानल पेठ
अपना काँर्नर
वसमत रस्ता
जिंतूर रस्ता
मोकाट जनावरांचा वाली कोण ?
महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडे एक ट्राँली ज्यात १२ ते १३ गाय, बैल, वासरु, कारवड यांना एकावेळी पकडून कोंडवाडा विभागात दाखल केले जाते. दिवसभरात ४ ते ५ जनावरे आढळतात. यानंतर त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था कोंडवाडा विभागात केली जाते. तेथे कमीत कमी १० दिवस या जनावरांचा सांभाळ केला जातो. ज्या पशू मालकाचे जनावर हरवले आहे, ते एक-दोन दिवसांच्या शोधानंतर कोंडवाडा विभागाकडे येतात. त्यांना जनावरांसाठी ठरवून दिलेल्या दंडाप्रमाणे पावती देऊन जनावर सुपूर्द केले जाते. वासरु, कारवड यांना ८५० रुपये तर गाय, बैल, म्हैस यांना १३५० रुपयांची पावती मालकाला दंड म्हणून दिली जाते.
वर्षभरात २०० जनावरे दिली गोशाळेला
मागील वर्षी सप्टेंबर ते या वर्षीच्या ऑगस्टअखेरपर्यंत जवळपास २०० जनावरे ज्यांचे मालक कोंडवाडा विभागाकडे आले नाहीत, अशी सर्व जनावरे गोशाळेकडे देखभालीसाठी सुपूर्द करण्यात आली, अशी माहिती कोंडवाडा विभागाचे विनय ठाकूर यांनी दिली.
मनपाच्या सर्वसाधारण सभेचा ठराव
शहरातील मोकाट जनावरे दिसल्यास त्यांना ताब्यात घेत कोंडवाडा विभागाकडे आणून त्यांचा १० दिवसपर्यंत सांभाळ करायचा. या काळात त्यांचे मालक आल्यास त्यांना ते जनावर दंडात्मक पावती देत दंड वसूल करुन परत द्यायचे, असा ठराव घेण्यात आला आहे. मात्र, तरीही शहरातील जनावरांचे मालक जनावरे मोकळी करुन त्यांना रस्त्यावर सोडून देतात. यात अनेकांना अडथळा होतो. तर काही जनावरे यामुळे अपघातग्रस्त होणे किंवा चोरीला जाणे असे प्रकार घडत आहेत. याकडे लक्ष देत जनावर मालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.