कालव्याच्या पुलावर वाहन चालकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:01+5:302021-02-16T04:19:01+5:30
देवगाव फाटा-सेलू-पाथरी-सोनपेठ-परळी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, परंतु आता नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब मध्ये हा ...
देवगाव फाटा-सेलू-पाथरी-सोनपेठ-परळी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, परंतु आता नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब मध्ये हा मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग करत होता, परंतु हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग मार्गाकडे हस्तांतरित झाल्याने या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. पाथरी-सोनपेठ-परळी या राष्ट्रीय महामार्गावर तहसील कार्यालयापासून ते गवळी पिंपरी पार्टी पर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने अक्षरश या रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. सोनपेठ तालुक्यातील नागरिकांची सर्वात जास्त वर्दळ परळी रस्त्यावर आहे. तालुक्यातील नागरिक परळी, अंबाजोगाई, तसेच लातूर येथे दवाखाना, शिक्षण यासह व्यापारासाठी जाणे-येणे असते, परंतु सोनपेठ परळी रस्त्यावर माजलगाव उजव्या कालव्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला अक्षरशः मोठमोठे खड्डे पडली आहेत. या ठिकाणाहून वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर याच मार्गावरून साखर कारखान्यासाठी होणारी ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते, परंतु या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.