गंगाखेड येथील चालक खुन प्रकरणातील आरोपी नऊ तासात गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:41 PM2017-11-07T17:41:52+5:302017-11-07T17:42:47+5:30
शहरात सोमवार रोजी दुपारी झालेल्या चालकाच्या खुन प्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अवघ्या नऊ तासात गंगाखेड पोलिसांनी मारेक-याचा शोध घेऊन आज पहाटे आरोपीस बेड्या ठोकल्या.
गंगाखेड( परभणी) : शहरात सोमवार रोजी दुपारी झालेल्या चालकाच्या खुन प्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अवघ्या नऊ तासात गंगाखेड पोलिसांनी मारेक-याचा शोध घेऊन आज पहाटे आरोपीस बेड्या ठोकल्या. यावेळी आरोपीने बहिणीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचे कबूल केले.
सोमवार दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास शहरातील डॉक्टर लाईनमधील सरस्वती विद्यालय मैदानाच्या बाजुला नगरसेवक राजु सावंत यांच्या खाजगी वाहनावरील चालक इलियास खान पठाण यांचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने खुन केल्याची घटना घडली होती. भरदुपारी घडलेल्या खुनाच्या या घटनेमुळे मयताच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी आरोपीच्या अटकेची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर दोन वेळा नांदेड पुणे राज्य महामार्ग रोखुन धरत व्यक्त केलेल्या रोषामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.
या प्रकरणी मयताची पत्नी शाहीनबी इलियास खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांयकाळी ७:२० वाजता गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.दुपारी घडलेल्या खुनाच्या घटनेने गंगाखेड पोलीस उपविभागाचा प्रभारी पदभार सांभाळणारे पूर्णा उपविभागाचे डी. वाय. एस.पी. अब्दुल गणी खान, पोलीस निरीक्षक सोहन माछरे, एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा आरोपीच्या शोधकामी लागला होता.आरोपी अज्ञात असल्याने पोलीसांनी राजु सावंत यांचे घर ते डॉक्टर लाईन पर्यंत रस्त्यावर असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासुन आरोपीला शोधण्याचा प्रयत्न चालविला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांना या खुन प्रकरणातील मारेकरी परभणी रोडवर येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पो.अ. विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी डी.वाय.एस.पी. अब्दुल गणी खान, पो. नि.माछरे, स.पो.नि. सुरेश थोरात, पो.उप.नि. राहुल बहुरे, रवि मुंढे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक प्रमुख स.पो.उप.नि. मोइनोद्दीन पठाण , पो.ना. राजेश पाटील, नवनाथ मुंढे, अण्णा मानेबोईनवाड, भारत तावरे, पो.शि.शेख जिलानी, सुग्रीव कांदे रवि कटारे, सतिश दैठणकर, जमादार सुरेश डोंगरे, आगाशे, गणेश कौठकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी परभणी रोडवर सापळा रचुन पहाटे ४:२० वाजेच्या सुमारास सय्यद इकबाल सय्यद अलीपाशा (वय ३२ वर्ष रा. रेल्वे कॉलनी, गंगाखेड) यास ताब्यात घेतले.
आरोपीला खान यांच्या खुनाबद्दल विचारणा केली असता त्याने बहिणीच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी इलियास यास जिवे मारल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच यापुर्वी सुध्दा त्याने इलियास खान यास जिवे मारण्याचा कट रचला होता. मात्र, त्यावेळी यश आले नव्हते असे ही त्याने पोलीसांना सांगितले. त्यास अटक करून मंगळवार रोजी दुपारी ३ वाजता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने दि.१० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो.नि. माछरे करीत आहेत.