परभणीतील मोंढ्याला दुष्काळाचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:48 PM2019-05-05T23:48:40+5:302019-05-05T23:49:00+5:30
सहा महिन्यांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या या जिल्ह्यातील परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या मोंढा बाजारपेठेला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत़ सहा महिन्यात निम्मी उलाढाल ठप्प झाल्याने या मोंढ्यावर अवलंबून असलेल्या शेकडो मजुरांसह हजारो व्यावसायिकांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सहा महिन्यांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या या जिल्ह्यातील परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या मोंढा बाजारपेठेला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत़ सहा महिन्यात निम्मी उलाढाल ठप्प झाल्याने या मोंढ्यावर अवलंबून असलेल्या शेकडो मजुरांसह हजारो व्यावसायिकांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत़
मागील वर्षीच्या सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात येणारा मान्सूनचा परतीचा पाऊस गायब झाला आणि जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र झाली़ जिल्ह्यात रबी हंगामावर अक्षरश: पाणी सोडावे लागले़ येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असल्या तरी दुसºया बाजुला याच शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या मोंढा बाजारपेठेतही दुष्काळचा तीव्र परिणाम झाला आहे़
परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तालुक्यातील १३१ गावांतील शेतकºयांचा शेतीमाल खरेदी केला जातो़ या शिवाय या शेतकºयांना लागणारे बियाणे, खते, औषधी आणि शेती साहित्याची विक्री याच ठिकाणी होते़ येथील व्यावसायिकांनी मागील वर्षी रबी हंगामाची पूर्व तयारी केली़ पावसाची प्र्रतीक्षा करता करता हिवाळा तोंडावर आला तरी पाऊस झाला नाही़ परिणामी रबी हंगामासाठी खरेदी केलेला लाखो रुपयांचा माल मोंढ्यात पडून आहे़ तर दुसरीकडे खरेदी-विक्र व्यवहार ठप्प झाल्याने हातावर पोट असलेले मजूरही उपासमारीचा सामना करीत आहेत़ सहा महिन्यांपासून दुष्काळाशी झगडत असलेल्या या मजुरांची परिस्थिती अधिकच विदारक असून, काही मजुरांनी मोंढा सोडून इतर ठिकाणी रोजगार शोधला आहे़
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस, गहू, सोयाबीन या शेतमालाची खरेदी केली जाते़ बाजार समितीतील व्यापाºयांकडून लिलाव पद्धतीेने केलेल्या खरेदीवर बाजार समितीला उत्पन्न मिळते़ मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीला १३० कोटी २७ लाख ४६ हजार ४०१ रुपयांचे उत्पन्न मिळाले़ यावर्षीच्या मार्चअखेर बाजार समितीचे उत्पन्न १५४ कोटी ७७ लाख ७२ हजार ९२९ रुपयांवर पोहचले आहे़ बाजार समितीला मागील वर्षीच्या तुलनेत २४ कोटी ५० लाख २६ हजार ५२८ रुपयांचे अधिक उत्पन्न झाले आहे़ मात्र वाढती महागाई, शेतमालांचे वाढलेले दर याची तुलना करता मागील वर्षीच्या तुलनेत या बाजार समितीला आर्थिक फटका सहन करावा लागला आहे़
मागील वर्षीच्या तुलनेत २ हजार रुपये अधिक दराने कापसाची खरेदी झाली़ १ हजार ८०० रुपये दराने सोयाबीनची खरेदी झाली आह़े त्याच प्रमाणे गव्हाची खरेदी गतवर्षीच्या तुलनेत अधिक दराने झाली आहे़ असे असतानाही उत्पन्नाचे आकडे मात्र मर्यादित असल्याने बाजार समितीला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यावसायिकांसह मजूर, बाजार समितीतील कर्मचारी, आडते अशा हजारो कुटूंबियांची गुजरान होते़ यावर्षी संपूर्ण हंगामात बाजार समितीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्यामुळे हजारो कुटूंबियांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ सध्या बाजारपेठेत कृषी निविष्ठांचा साठा केला जात आहे. आगामी जून, जुलै महिन्यात नवीन हंगामाला सुरुवात होत असून, जुने विसरून बाजार समितीतील व्यापारी नव्याने तयारीला लागले आहेत़
मजुरांची आर्थिक ओढाताण
४येथील बाजार समितींतर्गत कापूस जिनिंग, एमआयडीसी, मोंढा बाजारपेठ, मार्केट यार्ड आणि वेअर हाऊसमध्ये साधारणत: ६०० मजूर काम करतात़ दररोज मोंढा बाजारपेठेत येऊनही मजूर मंडळी दिवसभर दुकानांसमोर थांबलेली असतात़
४सर्वसाधारणपणे दररोज ४०० ते ५०० रुपये उत्पन्न मिळविणाºया या मजुरांना यावर्षी मात्र दिवसाकाठी १०० रुपये मिळणेही मुश्कील झाले आहे़
४बाजारपेठेतील खरेदी-विक्री ठप्प असल्याने दिवसभर हातावर हात ठेवून गप्प राहणे आणि सायंकाळी रिकाम्या हाताने घरी परतण्याची वेळ मजुरांवर आली आहे़ त्यामुळे येथील अनेक मजुरांनी पर्यायी रोजंदारीचा व्यवसाय निवडला आहे़
शेतमालांची घटली आवक
च्येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे़ रबी हंगामात उत्पन्न मिळाले नसल्याने त्याचा फटका बाजार समितीला सहन करावा लागत आहे़ तसेच ईनाम आणि लिलावात कापसाला कमी भाव मिळाल्याने त्याचाही उत्पन्नावर परिणाम झाला.
च्२०१७-१८ च्या हंगामात २ लाख २६ हजार ६०४ क्विंटल कापसाची आवक झाली होती़ त्या तुलनेत यावर्षी १ लाख ६६ हजार २५५ क्विंटल कापसाची आवक झाली आहे़ ६० हजार ३४९ क्विंटल आवक कमी झाली़ तर मागील वर्षी ५३ हजार ९१९ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती़ परिणामी आवकीत मोठी घट झाली आहे.
च्यावर्षी केवळ ४३ हजार ९६२ क्विंटल सोयाबीन बाजार समितीत खरेदी झाले आहे़ गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन खरेदीतून बाजार समितीला सुमारे १० लाख रुपयांचा फटका बसला आहे़ विशेष म्हणजे यावर्षी सोयाबीनचे भाव ३५० रुपयांनी वाढले होते़ परंतु, तरीही बाजार समितीला गतवर्षीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाले आहे़
मोंढा बाजारपेठेत दररोज सकाळी १० वाजताच दाखल होतो़ घरून येताना दुपारचे जेवणही सोबत घेतले जाते़ दिवसभरामध्ये हाताला काम मिळाले तर दुसºया दिवशीच्या पोटापाण्याची सोय होते़ परंतु, सहा महिन्यांपासून १०० रुपयांचे कामही लागत नसल्याने कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ दिवसभर मोंढ्यात थांबून सायंकाळी घरी जाताना उद्याचा दिवस कसा घालवायचा? याची चिंता लागलेली असते़
-अब्दुल मन्नान खान, मजूर
१५ वर्षांपासून मोंढ्यात मजुरीचे काम करीत आहे़ आतापर्यंत घर चालविण्यापुरते पैसे या ठिकाणी मिळत होते़ मात्र सहा महिन्यांपासून हाताला काम नाही़ त्यामुळे दिवसभर मोंढा बाजारपेठेत बसून रहावे लागते़ खरेदी आणि विक्री होत नसल्याने आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ घर कसे धकवावे, ही चिंता सतावत आहे़
-रफिक खान, मजूर