Drought In Marathwada : गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडीची बाराही महिने भिस्त अधिग्रहणाच्या पाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 07:49 PM2018-12-10T19:49:10+5:302018-12-10T19:53:17+5:30
पाणीबाणी : पाणी पातळी खोल गेल्याने अधिग्रहणाच्या विहिरींनीही साथ सोडली असून, पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती होत आहे़
- अन्वर लिंबेकर ( टाकळीवाडी, ता. गंगाखेड, जि़ परभणी )
गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी या गावात पाण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने बाराही महिने अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून ग्रामस्थांना पाणी भरावे लागत आहे़ पाणी नसल्याने गावातील मुलांचे सोयरपणही जुळत नसल्याची खंत येथील वृद्ध महिलांनी बोलून दाखविली़ सध्या तर पाणी पातळी खोल गेल्याने अधिग्रहणाच्या विहिरींनीही साथ सोडली असून, पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती होत आहे़
राणीसावरगाव ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्यात व गळाटी नदीच्या तीरावर वसलेल्या टाकळवाडी या गावाची लोकसंख्या ३०० एवढी आहे़ किल्ल्याचे गाव अशी जुनी ओळख आहे़ राणीसावरगावपासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या या गावाला आतापर्यंत कोणत्याही नळ योजनेचा लाभ मिळाला नाही़ गावात ३ हातपंप आहेत़ त्यापैकी एक कायमचा बंद तर दोन नादुरुस्त झाले आहेत़ परिणामी, बाराही महिने अधिग्रहणाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे़ उन्हाळ्यात ही परिस्थिती गंभीर होते़ अधिग्रहणाचे पाणीही बंद झाल्याने महिलांना घरकामासोबतच इतर कामे बाजूला सारून संपूर्ण दिवस पाण्यासाठी घालवावा लागतो़
टाकळवाडी गावाला नळ योजनेसाठी आजपर्यंत कुठलाही निधी मिळाला नाही़ ग्रामसेवक तिडके यांनी सांगितले, २०१२ साली ३ लाख रुपये खर्च करून पाणी साठवण्यासाठी जि़प़ शाळेसमोरील हातपंपावर सौरऊर्जेचा पंप बसवून पाण्याची टाकी उभारण्यात आली़ मात्र, सौर पंप बंद पडल्याने ही टाकी शोभेची वस्तू बनली आहे़ पाणीटंचाईपासून दिलासा मिळवण्यासाठी भीमराव नृसिंह डोईफोडे यांचा बोअर अधिग्रहण करण्यात आला आहे़ या ठिकाणाहून ग्रामस्थांना पाणी भरावे लागते़ टाकळवाडीवासीयांना पाणीटंचाई पाचवीलाच पुजली आहे.
१९८३ मध्ये घेतले तीन हातपंप
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत पाणीपुरवठा योजना राबविली नसली तरी ३५ वर्षांनंतर १९८३ मध्ये गावात तीन हातपंप घेण्यात आले़ त्यातील एक केव्हाच बंद पडला आहे़ उर्वरित दोन हातपंप दुरुस्तीअभावी बंद असल्याचे नारायणराव डोईफोडे यांनी सांगितले़
पाण्यासाठी तासन्तास रांग
गावात पाणी नसल्याने अधिग्रहण केलेल्या बोअरवरून पाणी भरावे लागते़ जि़प़ शाळेजवळील टाकीत सोडलेले पाणी भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते, असे ७० वर्षीय अनुसयाबाई देवकते यांनी सांगितले़
कामे सोडून पाण्यासाठी द्यावा लागतो वेळ. गावात नळ योजना नसल्याने अधिग्रहण करून घेतलेल्या बोअरवरून पाणी भरावे लागते़ वीज प्रवाह खंडित झाला तर विजेची वाट पाहावी लागते आणि दिवसभराची कामे सोडून पाण्यासाठीच संपूर्ण वेळ द्यावा लागतो, असे कोंडाबाई भागोजी डोईफोडे यांनी सांगितले़
माणसांची सोय नाही तिथे जनावरांचे काय?
गावात राहणाऱ्या माणसांच्या पिण्याच्या पाण्याची आजपर्यंत कोणतीही सोय करण्यात आली नाही़ त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे काय हाल असतील, असा प्रश्न निर्माण होत आहे़ शेतातील पिकांचे पाणी तोडून गावापर्यंत पाईपलाईन करीत गावकऱ्यांना पाणी दिले; परंतु गंगाखेड पंचायत समितीने दोन वर्षांपासून अधिग्रहणाचे पैसे दिले नाहीत, असे भीमराव डोईफोडे यांनी सांगितले़
विद्यार्थ्यांना मिळेना पाणी
शाळेसमोरच हातपंप आहे़ मात्र, तो नादुरुस्त असल्याने टाकळवाडी जि़प़ शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिग्रहणाचा बोअर चालू झाल्यास पाणी मिळते, असे मुख्याध्यापक ए़ आऱ सूर्यवंशी यांनी सांगितले़
सहा वर्षांपासून झळा
सहा वर्षांपासून गावाला पाणी नसल्याने टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ पूर्वी हातपंप सुरू असताना पाणी मिळत होते़ मात्र, आता हातपंप नादुरुस्त आहेत़ अधिग्रहणाच्या बोअरचे पाणी पाण्याच्या टाकीत येण्याची वाट पाहावी लागते़ गावात पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे पाहुण्यांच्या लक्षात आल्यानंतर तरुण मुलांचे लग्नही लवकर जुळत नसल्याचे विष्णुकांता डोईफोडे यांनी सांगितले़
परभणी जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा
मोेठे प्रकल्प :
येलदरी ६८़८५५ दलघमी (८़५० टक्के)
निम्न दुधना ३३़१८० दलघमी (१३़७० टक्के)
मध्यम प्रकल्प
करपरा १२़२५५ दलघमी (४९ टक्के)
मासोळी प्रकल्प निरंक
लघु प्रकल्प
एकूण २७ जलसाठा ०़५२ दलघमी (२८़८८ टक्के)