ग्रामीण भागात सेवा बंधनकारक केल्याने ६८ डॉक्टर दोन महिन्यांपूर्वी नव्याने रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:06+5:302021-06-23T04:13:06+5:30
ग्रामीण भागात सेवा करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी पुढे येत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची ...
ग्रामीण भागात सेवा करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी पुढे येत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त होती. नव्याने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची भरती केली असून, त्यांना ग्रामीण भागात सेवा करणे बंधनकारक केले आहे. शासनाच्या या धोरणामुळे जिल्ह्याला ६८ एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी प्राप्त झाले. ते सर्व रुजू झाले आहेत. आणखी चार वैद्यकीय अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जेवढ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश काढण्यात आले. ते सर्व रुजू झाले आहेत.
चार रिक्त जागा
जिल्ह्यात नवीन ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ६ आरोग्य केंद्रांची नव्याने निर्मिती झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती; परंतु दोन महिन्यांपूर्वी ६८ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश झाले असून, हे सर्व वैद्यकीय अधिकारी रुजू झाले आहेत. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चार जागा रिक्त आहेत. त्या भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करून आरोग्य सेवा चालविली जात असे. पदभरती करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला. कोरोनाच्या संसर्ग काळात नवीन पदभरती झाली असून, त्यात ग्रामीण भागासाठीही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम होण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यात नव्याने सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारतही बांधून पूर्ण झाली. मात्र, पदांना मंजुरी नसल्याने येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होती. दोन महिन्यांपूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने नव्याने स्थापन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा हा प्रश्नही सुटला आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाने नियुक्ती दिली असून त्यांना ग्रामीण भागात सेवा बंधनकारक केली आहे. त्यामुळे नियुक्ती मिळालेले सर्व वैद्यकीय अधिकारी रुजू झाले. त्यापूर्वी स्थानिक पातळीवर बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती केली होती. आता एम.बी.बी.एस. डॉक्टर्स मिळाले आहेत.
- डॉ. एस.पी. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी
अनेक विद्यार्थ्यांचे एम.बी.बी.एस. पुढील शिक्षण अपूर्ण असते. ते पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाते.
ग्रामीण भागात निवास व इतर सुविधा मिळत नाहीत. शहरी भागात शिक्षण झाल्याने ग्रामीण भागात जाण्यास टाळाटाळ होते.