पावसाच्या खंडामुळे परभणी जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 07:08 PM2018-09-22T19:08:13+5:302018-09-22T19:10:06+5:30
पावसाने दिलेल्या सलग २५ दिवसांच्या खंडामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत.
परभणी : पावसाने दिलेल्या सलग २५ दिवसांच्या खंडामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांची या हंगामावर भिस्त असते. हे शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करतात. यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाकडून ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. कृषी विभागाने केलेल्या नियोजनावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. जून, जूलै व आॅगस्ट या तीन महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसावर खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही पिके बहरली; परंतु, त्यानंतर पावसाने दिलेल्या खंडाने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे उडीद व मूग ही पिके हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार ही खरीप हंगामातील २ लाख ११ हजार ७७२ हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीन व १ लाख ५८ हजार ८८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेल्या कापूस लागवडीवर अवलंबून होती; परंतु, जिल्ह्यामध्ये २० व २१ आॅगस्टनंतर दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची बहरात आलेली साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस ही पिके धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिकांची परिस्थिती नाजूक झाली असून, कृषी विभागाने पंनचामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
नैसर्गिक संकटात सापडला शेतकरी
/>जिल्ह्यात १ लाख ५८ हजार ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सध्या कापूस पीक बहरले आहे. कृषी विभागाकडून बोंडअळीच्या संकटाला तोंड देण्यासाठी क्रॉपसॅप अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली; परंतु, या पाहणीत अधिकाऱ्यांना विदारक चित्र दिसून आले. याबाबत कृषी विभागाने कसोटीचे प्रयत्न करीत बोंडअळीस नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु, पावसाच्या खंडामुळे कापूस पिकावर रोगाचा प्रादूर्भाव ‘जैसे थे’ असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे.