प्रशासन उदासीनतेमुळे परभणी जिल्ह्यात घरकुलांच्या कामांना मिळेना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 08:15 PM2019-12-31T20:15:16+5:302019-12-31T20:16:58+5:30
६० टक्केच उद्दिष्ट पूर्ण, पंतप्रधान आवास, रमाई घरकुल योजनांचा समावेश
परभणी : सर्वांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेतील अनेक कामे रखडली आहेत़ दोन्ही योजनांचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसून रमाई आवास योजनेत ५७ टक्के तर पंतप्रधान आवास योजनेत ७० टक्के काम झाले आहे. उर्वरित कामे रखडल्याचे दिसत आहे़
सर्वांना हक्काची घरे मिळावीत, या उदात्त हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना २०१६ मध्ये सुरू केली़ तर अनुसूचित जातीतील नागरिकांनाही हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी २०१७ पासून रमाई आवास योजना राज्य शासनाने अंमलात आणली़ या दोन्ही योजनांच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे देण्यात येतात़ यासाठी जिल्हा प्रशासनाला दरवर्षी घरकुल बांधणीचे उद्दिष्ट देण्यात येते; परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या योजनांना बसत असल्याचे दिसून येत आहे़
रमाई आवास योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी २०१७ ते २०१९ या दरम्यान १३ हजार ८४१ घर बांधणीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते़ यामध्ये गंगाखेड तालुक्यासाठी १ हजार ३२४, जिंतूर तालुक्यासाठी ३ हजार ३८१, मानवत ७३६, पालम ७६९, परभणी २ हजार ९१, पाथरी १ हजार १०९, पूर्णा १ हजार ७४८, सेलू १ हजार ६१६ तर सोनपेठ तालुक्यासाठी १ हजार ६७ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ त्यापैकी आतापर्यंत केवळ गंगाखेड तालुक्यातील ६५५, जिंतूर २ हजार १३६, मानवत ४१३, पालम ३०३, परभणी १ हजार १५२, पाथरी ५६३, पूर्णा १ हजार ३९, सेलू १ हजार १२२, तर सोनपेठ तालुक्यातील ६४२ असे एकूण १३ हजार ८४१ घरकुलांपैकी केवळ ८ हजार २५ घरांची कामे पूर्ण झाली आहेत़ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०१६ ते २०१९ या तीन वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ४ हजार ८०८ घरकुल बांधणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु आतापर्यंत केवळ ३ हजार ३८७ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत़
यामध्ये गंगाखेड तालुक्यासाठी ६४६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी ४२० घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत़ जिंतूर तालुक्यासाठी १ हजार ७१ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले असता केवळ ७७२ घरकुले पूर्ण झाली आहेत़ मानवत २६२ पैकी २००, पालम ६१७ पैकी ४३४, परभणी ७१४ पैकी ५१८, पाथरी ३६२ पैकी २८१, पूर्णा ३९५ पैकी २८५, सेलू ३८१ पैकी २०७ तर सोनपेठ तालुक्यासाठी ३६० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत़ त्यापैकी केवळ २१७ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत़ त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतही ३० डिसेंबरपर्यंत ३ हजार ३८७ घरकुलांचीच कामे पूर्ण झाली आहेत़ त्यामुळे रखडलेल्या कामांना जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित यंत्रणांनी तत्काळ गती देवून दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करावीत व लाभार्थ्यांच्या हक्काचा निवारा त्यांना मिळवून द्यावा अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे़
वाळूअभावी रखडली कामे
केंद्र व राज्य शासन प्रत्येकाला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा प्रशासनाकडून वाळूबाबत स्वीकारलेल्या धोरणाचा घरकुल बांधकामाला फटका बसत आहे़ सध्या अनेक घरकुलांची कामे जिल्ह्यामध्ये प्रगतीपथावर आहेत; परंतु वाळूचा पुरवठा होत नसल्याने त्याचबरोबर खुल्या बाजारात वाळूचा भाव गगनाला भिडलेला असल्याने लाभार्थ्यांना ही वाळू घेऊन आपल्या घरांची कामे पूर्ण करणे शक्य नाही़ त्यामुळे घरकुल बांधणीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वाळूचा अडथळा येत असल्याचे पं़स़ प्रशासनाकडून सांगण्यात आले़
केवळ ६५०० लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याचे वितरण
रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्याला ४ हप्त्यामध्ये निधीचे वितरण करण्यात येते़ या योजनेत १३ हजार ८४१ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ त्यापैकी आतापर्यंत ८ हजार २५ घरकुले पूर्ण झाली आहेत़ यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये १० हजार ५४३, ८ हजार ९८६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, ८ हजार १६२ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे तर ६ हजार ४९२ लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्यातील निधीचे वितरण करण्यात आले़ त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे पूर्ण आहेत, त्यांना तत्काळ निधीचे वितरण करण्यात यावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे़