दुष्काळ पाहणी पथकाला माघारी येण्यास संतप्त शेतकऱ्यांनी भाग पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:50 PM2018-12-07T15:50:38+5:302018-12-07T15:51:23+5:30
संतप्त शेतकऱ्यांनी मानवत रोड रेल्वेगेट येथे अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा अडविला
- अभिमन्यू कांबळे
परभणी : प्रशासनाने केंद्रीय पथकाचा पूर्वनियोजित दुष्काळ पाहणी दौरा अचानक रद्द केल्याने गुरुवारी दुपारी ११़३० वाजेच्या सुमारास पेडगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी मानवत रोड रेल्वेगेट येथे अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा अडविला आणि पथकाला माघारी फिरण्यास भाग पाडले.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक गुरुवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते़ सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारातील शेतीची पाहणी करून हे पथक परभणी तालुक्यातील पेडगाव येथील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार होते़ तसा प्रशासनाने पूर्वनियोजित कार्यक्रमही जाहीर केला होता; परंतु पेडगाव येथील पाहणी दौऱ्यासाठी निवडलेले शेत मुख्य रस्त्यापासून २ कि.मी. आत असल्याने व या शेतशिवारापर्यंत जाण्यासाठी रस्ताही व्यवस्थित नसल्याने प्रशासनाने सकाळीच पेडगावचा दौरा रद्द केला.
त्यामुळे या पथकासमोर आपल्या व्यथा मांडण्यासाठी तयारी केलेल्या पेडगाव ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते़ पथकप्रमुख तथा केंद्रीय निति आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ समुपदेशक एस़सी़ शर्मा, ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी एस़एऩ मिश्रा, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांच्या पथकाने सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास गणेशपूर शिवारातील पाहणी केली़ त्यानंतर हे पथक सेलूमार्गे मानवत तालुक्यातील रुढी या गावातील शेतशिवाराची पाहणी करण्यासाठी निघाले़ सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास हे पथक मानवत रोड रेल्वेगेटपर्यंत आले असता नांदेडहून औरंगाबादकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस रेल्वे आली़ त्यामुळे या रस्त्यावरील गेट बंद करण्यात आले़ त्यामुळे या पथकाची वाहने आलीकडील बाजूस जागेवर थांबली़
त्याचक्षणी पेडगाव येथील शेतकरी संतोष देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, नागेश चांदणे, श्रीकांत गरड, शरद नंद, अशोक हरकळ, पुरुषोत्तम देशमुख, प्रसाद देशमुख हे शेतकरी पथकप्रमुख चौधरी यांच्या वाहनासमोर जाऊन थांबले़ यावेळी त्यांनी या वाहनात समोरील बाजूस बसलेले जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांना पेडगावचा दौरा रद्द का केला? याचा जाब विचारला़ प्रशासनानेच पेडगावची पाहणीसाठी निवड केली होती़ मग, अचानक दौरा कशासाठी रद्द केला? पथकाने किमान पेडगावमध्ये येऊन पीकपरिस्थितीची पाहणी करावी, शेतकऱ्यांशी संवाद साधावा, दुष्काळ जाहीर करायचा की नाही ते नंतर ठरवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी रुढीची पाहणी करून परत येऊ, असे सांगितले़ त्यावर प्रभाकर देशमुख या शेतकऱ्याने तुम्ही परत याल याचा आम्हाला विश्वास नाही़ त्यामुळे वाहने परत फिरवा; अन्यथा वाहनासमोरून हलणार नाही, हवे, तर अंगावरून वाहने घाला़; परंतु आता माघार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली़ यावेळी इतरही शेतकरी जमू लागले़ त्यामुळे पथकप्रमुख चौधरी यांनी अखेर पेडगावची पाहणी करण्याचा निर्णय घेतला़ त्यानंतर वाहनांचा ताफा परत पेडगावच्या दिशेने रवाना झाला़
पेडगाव येथे गणेश हारकळ या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीची पथकाने पाहणी केली़ त्यांच्याशी संवाद साधला़ त्यानंतर महादू राजाराम समरतकर या शेतकऱ्याच्या शेतातील पºहाटी झालेल्या कापूसपिकाची पाहणी केली़ त्यानंतर हे पथक पुन्हा मानवत तालुक्यातील रुढीच्या दिशेने पाहणीसाठी रवाना झाले़
वाहनांचा ताफा राहिला मागेच
शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर केंद्रीय पथकाने परत फिरण्याचा निर्णय घेतला़ त्यानंतर त्यांच्या वाहनचालकाने तातडीने वाहन परत पेडगावच्या दिशेने घेतले व हे वाहन सुसाट वेगाने धावू लागले. या पथकातील इतर अधिकाऱ्यांची वाहने जागेवरून वळवून पाठीमागील बाजूस घेताना बराच वेळ लागला़ तोपर्यंत पथकप्रमुखांचे वाहन जवळपास ७ ते ८ कि.मी. पुढे निघून गेले होते़ त्यामुळे पोलिसांच्या वाहनचालकांचीही गोची झाली़ पथकासोबत अगोदरच फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता़